बारामती : महान्यूज लाईव्ह
वालचंदनगर येथील वर्धमान विद्यालयातील शिक्षक शिवाजी पानसरे याने शालेय मुलींसमवेत अश्लील चाळे केल्याप्रकरणी बऱ्याच चर्चेनंतर वालचंदनगर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पानसरे याचा जामीन अर्ज बारामतीच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला असून या घटनेत शाळेचा प्राचार्य आणि वर्गशिक्षिका या दोघांनाही सहआरोपी करण्यात आले होते. या दोघांनी आता अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला असून, त्याची सुनावणी येत्या सहा डिसेंबर रोजी होणार आहे.
वर्धमान विद्यालयातील अकरा विद्यार्थ्यांनी शिवाजी पानसरे याने आपल्याशी अश्लील चाळे केल्याची तक्रार प्राचार्याकडे त्या शाळेतील विद्यार्थिनींनी ४ ऑक्टोबर 2022 रोजी दिली होती. मात्र प्राचार्याने कोणतीही दखल त्या संदर्भात घेतली नव्हती. पानसरे हा राष्ट्रवादीचा मातब्बर कार्यकर्ता असल्याने त्या दबाव खाली सारे जण होते अशी चर्चा होती.
त्यावरून परिसरात बरीच चर्चा झाल्यानंतर व आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांना याची दखल घ्यावी लागली व शिवाजी पानसरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा 22 ऑक्टोबर 2022 रोजी दाखल करण्यात आला.
त्यानंतर पोलिसांनी शिवाजी पानसरे या लिंगपिसाट शिक्षकाला अटक केली होती. यानंतर केलेल्या तपासामध्ये पोलिसांनी शाळेचा प्राचार्य हनुमंत कुंभार आणि शाळेची वर्गशिक्षिका लक्ष्मी सरगर या दोघांनाही सहआरोपी केले.
दरम्यान कारागृहात असलेल्या शिवाजी पानसरे याने बारामती सत्र न्यायालयात जामिनाचा अर्ज केला होता. यासंदर्भात जिल्हा व सत्र न्यायाधीश न्यायाधीश श्रीमती के. एस. बाकरे यांच्यासमोर या जामीन अर्जाची सुनावणी झाली.
यामध्ये फिर्यादीच्या वतीने सरकारी वकील एडवोकेट के. एस. नवले व ऍडव्होकेट अविनाश झणझणे व अॅड. काकडे यांनी युक्तिवाद केला. बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सरकारी वकील व फिर्यादीच्या वतीने असलेल्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य म्हणून शिवाजी पानसरे याचा जामीन अर्ज फेटाळला.
त्या मातेला सलाम…
या घटनेनंतर ही घटना जेवढी दाबून टाकण्यासाठी प्रयत्न झाले, त्यापेक्षाही घटना उघडकीस आणण्यासाठी देखील सर्व स्तरातून नागरिकांनी प्रयत्न केले. या प्रयत्नांमध्येच ज्या मुलींवर अशा प्रकारचा प्रसंग करण्याचा प्रयत्न पानसरे याने केला, त्या मुलींपैकी एका मुलीची आई सातत्याने या संदर्भात न्यायालयात देखील पाठपुरावा करत होती. तिच्या पाठपुराला देखील यश आले. आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ती महिला सातत्याने या प्रकरणात आग्रही राहिली तिचे कौतुक होत आहे.