उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यात एका व्यक्तीने उंदराला दोरीने बांधून गटाराच्या पाण्यात बुडवू बुडवू मारले… म्हणून हृदय पिळवटून गेलेल्या प्राणीमित्राने थेट फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनीही या उंदराच्या हत्येची गंभीर दखल घेत या युवकाची तब्बल १० तास चौकशी केली..
आता या युवकाचा कडेलोट होणारच होता, तेवढ्यात पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आलाय की, या उंदराचा मृत्यू गुदमरून झाला आहे. त्याची फुफ्फुसं निकामी झाली म्हणून त्याचा मृत्यू झाला आहे.. ऐकलं का, मनेका गांधीजी!
बदायूमधील घटनेने आता त्रास देणारी हलकट उंदरं देखील मारायची नाहीत हे एव्हाना देशभरात पोचले आहे. गंमत म्हणजे त्या उंदराचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. कारण त्याची माहिती भाजपच्या खासदार डॉ. मनेका गांधी यांच्यापर्यंत पोचली होती. त्यांनी यात तातडीने लक्ष घातले होते अशी सूत्रांची माहिती आहे, त्यामुळे पोलिसांनीही ही बाब गांभिर्याने घेतली. जर उंदराकडे गांभिर्याने पाहिले नसते, तर पोलिसांची वाट लागली असती.
भारतीय वन संरक्षण अधिनियम १९७१ नुसार कोणत्याही प्राण्याची निर्दयी हत्या केल्यास ३ वर्षांची शिक्षा व १० हजार रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते, तशी तरतूद असल्याने पोलिसांनी उगाच डोक्याला ताप नको म्हणून तातडीने अॅक्शन घेतली.
संबंधित युवकाची तब्बल १० तास चौकशीही केली. मात्र या उंदराचे पोस्टमार्टेम करण्यासाठी योग्य जागा नव्हती, म्हणून तब्बल २५ किलोमीटर पर्यंत त्याला शववाहिका उपलब्ध करून देण्यात आली. तसेच शवविच्छेदनाचा खर्चही संबंधित प्राणिमित्राने केल्याची घटना समोर आली आहे.
दरम्यान या उंदराचे शव बरेली येथील इज्जतनगर येथील शवागृहात ठेवण्यात आले होते. दोन उच्चस्तरीय डॉक्टरांनी त्या उंदराचे शवविच्छेदन केले. मग पशुसंवर्धन विभागाचे सहसंचालक डॉ. के.पी. सिंग यांनी याची माहिती दिली. २५ नोव्हेंबर रोजी या उंदराचे शवविच्छेदन झाले असून त्याची फुफ्फुसं त्याच्या मृत्यूआधीच निकामी झाली होती. त्यामुळे त्याला श्वास घेण्यात अडचण येत होती. त्याला आतड्याचा संसर्गही झाला होता. त्याच्या फुफ्फुसात पाण्याचा अंश आढळून आला नाही. त्याचा श्वास गुदमरला आणि तो मेला.