बारामती – महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीचा कार्यकर्ता झाला की, बऱ्याचदा तो आपण कसे पवार कुटुंबियांच्या जवळ आहोत असे दाखवतो. मात्र यात भामटेही मागे राहीलेले नाहीत. अफरातफर व पैशाची फसवणूक करणारे भामटेच यामध्ये राष्ट्रवादीच्या ओरीजनल कार्यकर्त्यांपेक्षा अधिक पुढे आहेत. याचा फटका पुण्यातील शिक्षिकेलाही बसला. तब्बल १० लाखांची आर्थिक फसवणूक झाल्यानंतर तिने थेट अजितदादांच्या कार्यालयाशी संपर्क साधला आणि तपासाची चक्रे एवढी वेगाने फिरली की, बारामतीतील डॉक्टर व फलटणच्या भामट्याची टोळी पोलिसांच्या रडारवर आली.
याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात डॉ. कृष्णा जेवादे व फलटण येथील सोमनाथ इंगळे याच्याविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी हडपसर येथील स्मिता विश्राम वाघोले या शिक्षिकेने फिर्याद दिली होती.
याप्रकरणाची थोडक्यात माहिती अशी, वाघोले या पुणे महापालिकच्या शाळेत शिक्षिका आहेत. त्यांना गुडघेदुखीचा त्रास होता, म्हणून मागील वर्षी त्या बारामतीतील विश्वजीत दवाखान्यात आल्या.
तेथे कृष्णा जेवादे व सोमनाथ इंगळे यांची उपचारादरम्यान त्यांची ओळख झाली. या दरम्यान तुम्हाला पदोन्नती मिळाली पाहिजे, तुम्ही दिव्यांग आहात असे सांगून त्यांना पदोन्नतीचे अमिष या दोघांनी दाखवले. हे करताना त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो दाखवले.
आम्ही राष्ट्रवादीचे अत्यंत निकटचे पदाधिकारी आहोत असे भासवून पदोन्नतीसाठी १० लाखांची रक्कम लागेल असे सांगितले. या शिक्षिकेने त्यावर विश्वास ठेवत सुरवातीला ३ लाख त्यानंतर दीड लाख रुपये दिले. त्यानंतर बारामतीत येऊन वाघोले यांनी साडेपाच लाख रुपये रोख दिले.
मात्र दोन महिन्यात काम होईल असे सांगणारे जेवादे व इंगळे नंतर वाघोले यांचे फोन घेत नव्हते. काम झाले नाही, तर पैसे परत करतो असे सांगणाऱ्यांनी नंतर उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरवात केली, त्यानंतर फोन बंद करून टाकले.
त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने वाघोले यांनी थेट विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. तिथे फसवणूकीची माहिती देताच पवार यांच्या कार्यालयाने तातडीने गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आणि वाघोले यांच्या तक्रारीनुसार जेवादे व
इंगळे याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.