संपादकीय
राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४८ गावांनी पाणी प्रश्न सुटत नाही, म्हणून कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला, त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी लागलीच ही गावे कर्नाटकात घेण्याचा मुद्दा मांडला आणि महाराष्ट्रात आगडोंब उसळला..
लागलीच त्या गावांमध्ये सरकारी अधिकारी फिरू लागले. त्यामुळे ओरडल्याशिवाय आईदेखील दखल घेत नाही, म्हणून गुजरात आणि तेलंगणा सीमाभागही म्हणू लागलाय आम्हाला आता महाराष्ट्रात राहायचे नाही..!
जत तालुक्यातील ४८ गावांना कर्नाटक खुणावत असतानाच आता नव्याने तेलंगणा राज्याला लागून असेलल्या नांदेड जिल्ह्यातील किनवट, देगलूर, उमरी, धर्माबाद, बिलोली या तालुक्यातील काही गावांत सीमेवर राहतो, म्हणून विकासापासून दूर ठेवतात अशी भावना पसरली असून तेथील युवकांमध्ये आता इतर राज्ये विकास करतात, महाराष्ट्रात फक्त अस्मितेवरच पोट भरायचे का? असा सवाल फेर धरू लागला आहे.
दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील सुरगणा तालुक्यातील काही गावांतील ग्रामस्थ गुजरातमध्ये आम्हाला विलीन करा अशी मागणी करू लागले आहेत. खरोखऱच ही गावे किंवा ग्रामस्थ असे म्हणत आहेत, त्यामागची मजबुरी काय आहे हेही जाणून घेण्याची व गांभिर्याने जाणून घेण्याची गरज आहे.