दिल्ली – महान्यूज लाईव्ह
गेली आठ वर्षे राज्यकर्त्यांना ज्यांची भीती वाटत होती, तो एकमेव निष्पक्ष न्यूज चॅनेल एनडीटीव्ही हा अदानी ग्रुपने प्रेशरने ताब्यात घेतल्यानंतर एनडीटिव्हीचे संचालक प्रणव रॉय व राधिका रॉय यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला, त्यानंतर काही तासातच संपादक व देशातील ख्यातनाम पत्रकार रवीश कुमार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
रवीश कुमार यांचे प्राईम टाईम, रवीश की रिपोर्ट, हम लोग, देस की बात असे शो प्रचंड गाजले. त्यांच्या या प्रत्येक शोची सर्वांनाच उत्सुकता असायची. आता हे शो दिसणार नाहीत. किंबहुना त्यात मै रवीशकुमार.. हे वाक्य व या कार्यक्रमातील भिडणारी पत्रकारिता दिसणार नाही.
देशातील पत्रकारिता भांडवलशाहीच्या ताब्यात गेल्यानंतरही आपला आवाज बुलंद करीत एकतर्फी बातमीदारीला छेद देत देशातील जे वास्तव इतरत्र कोठेही दाखवले जात नाही, ते थेट समोर आणण्याचा ते प्रयत्न करीत होते. त्यामुळे रवीशकुमार हा विस्थापितांचा बुलंद आवाज बनले होते.
गेली वीस वर्षे ते एनडीटिव्हीशी जोडले होते. आता ते एनडीटिव्हीचे वरिष्ठ कार्यकारी संपादक होते. पत्रकारितेसाठी रॅमन मॅगसेसे पुरस्कारही त्यांना मिळाला होता. ते राजीनामा देतीलच याची अटकळ बांधली जात होती. डॉ. प्रणव रॉय यांच्या राजीनाम्याने ही अटकळ अधिक प्रकर्षाने व्यक्त केली गेली. रॉय यांच्या जाण्याने या देशातील निष्पक्ष पत्रकारितेचे एक युग आता संपल्यात जमा आहे.
काय घडलं आणि एनडीटिव्ही अदानीच्या ताब्यात गेली?
माध्यम क्षेत्रातील चर्चेनुसार असं सांगितलं जात की, एनडीटिव्हीने सन २००९ मध्ये विश्वप्रधान कंपनीकडून ३५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या कर्जाच्या कराराप्रमाणे या कर्जाचे रुपांतर विश्वप्रधान कंपनी शेअरमध्ये करू शकत होती. २३ ऑगस्ट २०२० मध्ये याचाच वापर करीत एनडीटिव्हीमधील २९ टक्के वाटा विश्वप्रधान कंपनीने आपल्या नावावर केला आणि दुसरीकडे २३ ऑगस्ट २०२२ रोजी अदानी ग्रुपच्या एएमजी मिडिया कंपनीने विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड अर्थात व्हीपीसीएल कंपनीचं अधिग्रहण केलं. आणि इथूनच एनडीटीव्हीची मालकी अदानी ग्रुपकडे येण्याचा मार्ग मोकळा झाला.
तत्पूर्वी सन २०२० मध्ये सेबीने अशाच प्रकरणाचा आधार घेऊन राधिका रॉय व प्रणव रॉय यांना शेअर्सच्या खरेदीविक्रीची बंदी घातली. त्यांच्याकडील असलेले शेअर्स त्यांना वर्ग करता येणार नसल्याचे सेबीने जाहीर केले. २६ नोव्हेंबर रोजी ही बंदी संपली आणि रॉय यांनी राजीनामे दिले. तर काही दिवसांपूर्वीच फोर्सफुली ३० टक्के शेअर विकत घेत अदानी ग्रुपने एनडीटिव्ही ताब्यात घेऊन हा समूह विकत घेतल्याची घोषणा केली होती.