सातारा – महान्यूज लाईव्ह
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर आज खासदार उदयनराजे चांगलेच भडकले. त्यांनी राज्यपालाचा एकेरी उल्लेख करीत चांगलीच धुलाई केली.
आज उदयनराजेंना पत्रकारांनी राज्यपाल कोशियारी यांच्याबाबत छेडले असता, ते म्हणाले, राज्यपालाने मोठी घोडचूक केली आहे, एखादा निर्लज्जच त्या पदावर राहू शकतो. मुळात त्याने केले आहे की, कसे केले हेच माहिती नाही. त्यांच वय पाहता मला कळत नाही, त्यांना विस्मरण तरी होते आहे. त्यांना एक वृथ्दाश्रम पहा. अर्थात ते वध्दाश्रमात घेतील की नाही माहिती नाही.
तिथेही वाद करतील, मग एकच ठिकाण राहते.. हा शुध्द वेडेपणाच आहे. मग वेड्यांच्या बाबतीत काय केले पाहिजे? याला कुठली मस्ती आहे, प्रत्येकवेळी काहीही बोलतो. याचा जन्म तरी झाला होता का, त्यावेळी? महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीत बोलायची याची लायकी आहे का? तु त्यावेळी काय करीत होता ते सांग ना!
शिवरायांमुळे भारतात लोकशाही नांदते आहे, ते प्रेरणास्थान आहेत असे सांगत उदयनराजे यांनी पत्रकार परीषदेची सुरवात केली. जर छत्रपती शिवाजीराजांचे विचार तुम्ही अंमलात आणत नसाल, तर त्यांचे नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? असेच जर चालत राहीले, तर पुर्वी तीन तुकडे झाले, प्रत्येक जण व्यक्तीकेंद्रीत, विशिष्ठ समाजाचा विचार करीत राहाल, तर समाजाचे नुकसान होईलच, मात्र प्रत्येक राज्य वेगळे होईल.
छत्रपती शिवाजीराजांनी जगाला लोकशाही शिकवली. आज त्यांचाच अपमान साहित्यातून लेखणीतून, भाषणातून, सिनेमातून करता आहात? आज सोईनुसार सर्वधर्मसमभाव शिकवला जातोय. असेच चालत राहीले, तर पुढच्या पिढीला आपण काय सांगणार आहोत? प्रत्येक राज्याचा प्रमुख हा राज्यपाल असतो. उद्या आणखी मोठ्या पदावरचा असे वक्तव्य करेल. हे चालत राहीले, म्हणून राज्यपालाने धाडस केले. मग आपण काय, महापुरूषांचे फक्त पुतळे उभारायचे का?
राज्यपालावर कारवाई करायलाच हवी. ते करतील याची मला खात्री आहे. राज्यपालाची हकालपट्टी झालीच पाहिजे. त्याने माफी मागितली म्हणून काय झाले, राजीनामाच दिला पाहिजे. एखाद्याला भोसकले व माफी मागितली तर चालेल का? जर या कोश्यारीचे समर्थन कोणी करीत असेल, तर त्यांनी कोशियारींचे नाव घ्यावे, छ्त्रपतींचे नाव घेऊ नये.
सावरकर असू दे, नाहीतर अन्य कोणीही.. छत्रपती शिवाजीमहाराजांपुढे कोणीच नाही. या सर्वांनी शिवाजीराजांचे नाव घेऊनच काम केले आहे ना? मी कोश्यारी किंवा तो त्रिवेदी यांच्यापुरते बोलत नाही. भविष्यात कोणीच असे वक्तव्य करणार नाही यासाठी बोलतो आहे.