हिंगोली – महान्यूज लाईव्ह
असं म्हणतात की, गाव करील ते राव करील काय? हिंगोली जिल्ह्यातील सूरजखेडा (ता. सेनगाव) येथील ग्रामस्थांनी कमी दाबाने वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या अभियंता व वायरमनलाच अनोख्या आंदोलनाने करंट दिला.. अख्खं गावच जेव्हा वीजेच्या टॉवरवरच चढले तेव्हा महावितरणचे अभियंताही हवालदिल झाल्याचे पाहावयास मिळाले.
अगोदर वीजबिले भरा, मग वीज जोडतो अशी सध्या भूमिका घेणाऱ्या महावितरणला या गावाने चांगलाच धडा शिकवला आहे. अर्थात महावितरणचे अधिकारी, कर्मचारी अशा आंदोलनाने खरोखरच जाग्यावर येतील का हा देखील प्रश्नच आहे.
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील सुरजखेडा गावात विजेच्या प्रश्नावरून संतप्त गावकरी थेट टॉवरवर चढले. वारंवार निवेदने देऊनही वीजेची समस्य़ा सुटत नाही. शेजारच्या गावांना १६ तास विजेचा पुरवठा व सूरजखेडा गावाला मात्र कमी दाबाने वीज मिळत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती.
त्याकरीता गावकरी वारंवार महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटले, वारंवार निवेदने दिली, मात्र त्याचा काही फायदा झालाच नाही. अखेर गावकऱ्यांनी अनोखे आंदोलन करायचे ठरवले. महावितरणच्या मुख्य अभियंता श्रीमती पाटील यांना निवेदन दिले आणि आंदोलनाची तयारी केली. मग खरोखरच वीजेच्या टॉवरवर गावकरी चढले. उच्च दाब वाहिनीच्या टॉवरवरच गावकरी चढल्याने महावितरणचे अधिकारी हवालदिल झाले.
पोलिस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन थांबविण्याचे प्रयत्न झाले, मात्र जोपर्यंत महावितरणकडून ठोस उपाययोजना होत नाही, तोवर आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असे ग्रामस्थांनी निक्षून सांगितले. गजानन मगर, धम्मप्रकाश मोरे, बबन मगर, मारुती सुळे, अनिल मगर, नारायण मगर आदींसह शेकडो गावकरी यात आक्रमक झाल्याने महावितरणला अखेर नमते घ्यावे लागले.