विक्रम वरे महान्यूज लाईव्ह
बारामती – यंदाची ग्रामपंचायत निवडणुक नात्यातील, भावकीतील लढतीनी गाजणार आहे. ग्रामपंचायत निवडणूकीचे फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे. निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सध्या पारावर, वस्तीवर, गावागावात निवडणुकीच्या चर्चा रंगल्या आहेत.
यावर्षीही निवडणुकीत ‘सरपंच’ पद निवड थेट जनतेतून आहे. त्यामुळे अनेक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. सरपंचपदासाठी पुरुष खुला आणि महिलांसाठी खुल्या असलेल्या गावामध्ये कमालीची चुरस पाहायला मिळणार आहे. सरपंचपदाचे उमेदवाराने आपण कसा गावाचा विकास करणार व निधी कसा मिळवणार हे मतदारांना पटवून देत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कोण निवडून येणार याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. कारण उमेदवार नात्यातील, भावकीतील असल्यामुळे मतदारांपुढे मतदान तरी कोणाला करायचे असा पेच आहे. राजकीय पक्षाच्या चिन्हावरती या निवडणुका होत नसल्या तरी स्थानिक नेत्यांसाठी अतिशय प्रतिष्ठेच्या असलेल्या या निवडणुकीच्या रिंगणात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
प्रत्येक ठिकाणी गाव पातळीवर एकाच पक्षाचे दोन गट पाहायला मिळतात.त्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रमुख राजकीय पक्षांचे नेते,कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये आपली प्रतिष्ठा पणाला लावत असतात.त्यामुळे या होणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.गावा-गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विद्यमान सदस्य व विरोधकानी निवडणुकीची रणनीती तयार केलेली आहे.
एखादे गाव मोठ्या वस्तीचे असेल तर या आळीत एकदा,त्या आळीत दुसऱ्यांदा अशी जेवणाची विभागणी झाली आहे. मतदारांसाठी गावजेवण,धाब्यावर पंगती उठू लागल्या आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विद्यमान सदस्य व इच्छुक मंडळींनी अनेक दिवसांपासून तयारी सुरू केली आहे. कोणत्या गल्लीतील घर कुणाच्या बाजूने आहे आणि कोण विरोधात आहे याची तोंडपाठ माहिती उमेदवारांना आहे. त्यांच्यासाठी किंमत मोजण्याची तयारी उमेदवारांनी ठेवली आहे.
कोणत्याही निवडणुकीत तरुण कार्यकर्त्यांना भाव येतो. सध्या तरुणाई सुद्धा गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपासून ग्रामपंचायतीमध्ये स्वतःचे स्थान मिळवताना दिसत आहे. त्यामुळे काही ठिकाणी तालुक्यात स्थान असलेल्या नेत्याना ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दमछाक होताना दिसत आहे. विकासाचे आश्वासन प्रत्येकच उमेदवार देत असला तरी निवडून कोणीही येऊ दे पण गावाचा विकास झाला पाहिजे व नागरिकांना सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. अशी अपेक्षा मतदारराजा करताना दिसत आहे.