नाशिक महान्यूज लाईव्ह
ऊसतोडणीसाठी गाव सोडून निघालेल्या नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज येथील एका ऊसतोडणी कुटुंबाच्या बैलगाडीला एसटीने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, या धडकेत मजूराच्या कुटुंबातील मायलेकरांचा मृत्यू झाला. तर एक बैल जागीच ठार झाला. या कुटुंबातील इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. संपूर्ण कुटुंबच अचानक काळाच्या या अनपेक्षित घावाने अत्यवस्थ झाले.
ही घटना औरंगाबाद- पुणे महामार्गावरील इसारवाडी फाटा येथे घडली. पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, हे ऊसतोड मजूर कुटुंब औरंगाबाद – पुणे महामार्गावरून जात होते. महामार्ग ओलांडत असताना बैलगाडीला एसटी (एमएच १४ बीटी २५००) ने पाठीमागून जोरदार धडक दिली.
यात बैलगाडीतील सोन्याबाई गोविंद गिरे व अर्जून गोविंद गिरे हे मायलेक जागीच ठार झाले. तर गोविंद विठ्ठल गिरे व बाळू गोविंद गिरे हे दोघे बापलेक गंभीर जखमी झाले. या दोघांना औरंगाबाद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.