मुंबई – महान्यूज लाईव्ह
मांजर कोठूनही टाका, ती चार पायांवरच पडते अशी एक म्हण आपल्याकडे रुढ आहे.. सध्या राज्यात ज्यांचा अधिक बोलबाला आहे, ते डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याबाबतही तसंच काहीसं बोलावं लागेल.. तुम्ही कितीही युक्ती लावा.. शक्ती लावा.. द्वेष करा.. तुकाराम मुंडे यांना कोणत्याही खात्यात बदलले, तरी तेथे ते त्यांच्याच पध्दतीने काम करतात.. म्हणूनच गेल्या १७ वर्षात तब्बल १८ बदल्या झाल्या, तरी हा गडी अजिबात मागे हटलेला नाही. दुर्दैव असे की, मुंडे यांच्या कार्यपध्दतीवर खूष असलेला सामान्य महाराष्ट्रीय माणूस त्यांना मिळणाऱ्या या वागणूकीबद्दल सरकारच्या विरोधात कधीच उठाव करीत नाही..!
राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त म्हणून दोनच महिन्यापूर्वी रुजू झालेल्या तुकाराम मुंडे यांची राज्य शासनाने आता शिर्डीच्या संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. दोन महिन्यापूर्वीच त्यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक म्हणून पदभार दिला होता. त्यानंतर रात्रीच्या वेळी त्यांनी दवाखान्यांवर धाडी टाकल्या आणि कामचुकारांची पळता भुई थो़ी झाली.
याच कर्मचाऱ्यांच्या संघटनेने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे तक्रार केली आणि आश्चर्य म्हणजे हाफकिनमुळे चर्चेत आलेल्या तानाजी सावंत यांच्याकडून सूचना सुरू झाल्या. अखेर तर मुंडे यांना कार्यमुक्त करण्याचेही आदेश दिले गेले.
खरेतर मुंडे फक्त रुजू झाले आणि राज्यातील रुग्णालयांमधील कर्मचारी वेळेत कामावर हजर होऊ लागले होते. बायोमेट्रीक हजेरीतील वेळेचा हा देखावा बरेच काही सांगून जात होता.
एरवी टंगळमंगळ करणारेही आपल्यापुढील काम तातडीने हातावेगळे करू लागले होते. त्यातच मुंडे यांनी एक फासा टाकला आणि त्यांची भेट कधीही होऊ शकते म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्यापासून शिपायापर्यंत सारेच टरकून गेले होते.
तुकाराम मुंडे यांनी नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेडचे उपजिल्हाधिकारी, धारणीचे प्रकल्प अधिकारी, सोलापूरचे महापालिका आयुक्त, जालन्याचे जिल्हाधिकारी, मुंबईचे विक्रीकर आयुक्त, सोलापूर जिल्हाधिकारी, नागपूर महापालिका आयुक्त, नवी मुंबई आयुक्त, नाशिकचे आदिवासी विभागाचे अतिरिक्त आयुक्त, पीएमपीएएलचे अध्यक्ष, केव्हीआयसी मुंबईचे आयुक्त, नाशिकचे महापालिका आयुक्त, मुंबईचे नियोजन विभागाचे सहसचिव, एडस नियंत्रण मंडळाचे प्रकल्प संचालक आणि आता राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालकपदाची ५९ दिवस काम पाहिल्यानंतर शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी असा बदल्यांचा प्रवास अनुभवलेला आहे.