दौंड: महान्यूज लाईव्ह
दौंड मधून फरार झालेला व बारामतीच्या सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळलेला दौंडचा माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचा नेता बादशाह शेख यांच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. राजस्थानमध्ये जाऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत ही यशस्वी कामगिरी केल्याचे समजते.
महिलेचा विनयभंग करून केला म्हणून जाब विचारण्यास गेलेल्या तिघा जणांना तलवारी, कोयते घेऊन मारहाण केली व जातीवाचक शिवीगाळ केली या कारणावरून दौंडचा माजी नगराध्यक्ष बादशाह भाई शेख, इलास इस्माईल शेख, राशीद इस्माईल शेख, अरबाज सय्यद, वाहिद खान, जुम्मा शेख, वसीम शेख, जिलानी शेख व इतर दहा ते बारा जणांवर दौंड पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती अधिनियम तीन एक नुसार ॲट्रॉसिटी व मारहाणीचा तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.
दौंड पोलिसांनी या संदर्भात सुरुवातीला तीन आरोपी पकडले होते. मात्र हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन बादशाहा शेखच्या विरोधात मोर्चा काढला होता. या मोर्चाला चक्क भाजपने आमदार नितेश राणे यांना दौंड मध्ये बोलावले होते आणि त्यानंतर पोलिसांना 48 तासाचा अल्टिम देऊन राणे येथून निघून गेले होते.
त्यानंतरही पोलिसांना बादशहा शेख सापडला नव्हता, मात्र पोलीस सूत्रांनी बादशहा शेख चा ठावठिकाणा समजला असल्याची माहिती दिली होती.त्यानंतरही पोलिसांना त्याचा मागमूस कळत नव्हता, मात्र आज अखेर राजस्थानमध्ये जाऊन त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत.
या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून बादशहा शेख याने बारामती जिल्हा सत्र न्यायालय दाद मागितली होती. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर 23 नोव्हेंबर रोजी सत्र न्यायालयाने शेख याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. यानंतर बादशाह शेख यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती.
काय झालं होतं दौंडमध्ये?
दौंड शहरातील कुंभार गल्ली परिसरात हा प्रकार घडला असून संबंधित पिडीत महिला तिच्या आत्याच्या घरून दळण्याचा डबा घेऊन कुंभार गल्ली येथे गिरणीत ठेवण्यासाठी गेली होती.
त्यावेळी तेथून परत येत असताना रस्त्यावर राशीद शेख, वाहिद खान, अरबाज सय्यद, बादशहा भाई शेख, जिलानी शेख व इतर दहा ते बारा लोक रस्त्यावर उभे होते. रस्त्याने जात असताना राशिद इस्माईल शेख हा समोर आला व त्याने पीडित महिलेच्या अंगावरील ओढणी हाताने ओढून घेतली व ती ईलास इस्माईल शेख याच्याकडे फेकली.
त्यामुळे संबंधित पिडीत महिला तेथून घाबरून घरी पळत गेली व घरी जाऊन आत्याच्या मुलासोबत चुलत भावास ही घटना सांगितली. त्यावरून हे तिघेजण पुन्हा राशीद इस्माईल शेख याला जाब विचारण्यासाठी गेले असता या सर्वांनी या तिघांना लाकडी दांडक्याने मारहाण केली.
त्यानंतर पुन्हा हे सर्वजण तलवारी व कोयते घेऊन घरासमोर आले आणि त्यांनी पीडित महिलेच्या चुलत भावास तोंडावर मारून जखम केली व आत्याच्या मुलास जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवारीने डोक्याच्या डाव्या बाजूस मारून गंभीर दुखापत केली. यावेळी त्यांनी आमच्या गल्लीत राहू नका असे सांगत जातीवाचक शिवीगाळ केली.
या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी वरील आठ जणांसह अनोळखी दहा ते बारा जणांना विरोधात ॲट्रॉसिटी मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.