सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – इंदापूर तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर दररोज सकाळी व सायंकाळी अनेक नागरिक व्यायामासाठी येत आहेत.मात्र संकुलाच्या मुख्य मैदानावर लहान काटे असलेल्या वेली जमीनीवर पसरलेल्या असून कुसळाच्या गवतामुळे युवकांना सराव करताना अडचणी येत आहेत.पायात गवत टोचत असल्यामुळे या मैदानावर पोलीस भरतीसाठी सराव करणा-या युवकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. सध्या हिवाळा सुरू असून थंडीचे दिवस सुरू असल्याने या दिवसात व्यायाम करणे शरीराला पोषक असल्याच्या पार्श्वभूमीवर युवकांबरोबर जेष्ठ नागरिक सुध्दा चालणे तसेच व्यायाम करताना दिसत आहेत.
संकुलाच्या जवळच असलेल्या प्रसिद्ध असणाऱ्या तालमीत असणाऱ्या लहान मुलां बरोबरच मोठ्या वयोगटातील पैलवान मैदानावर पहाटे सराव करताना दिसत आहे.लहान मुलेही चांगला सराव करताना दिसत आहे.पोलीस भरती काही दिवसांवर येवून ठेपली आहे. त्यामुळे युवा वर्ग तसेच मोठ्या प्रमाणावर युवतीही रनिंग त्याचप्रमाणे पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारा व्यायाम याच मैदानावर करताना दिसून येत आहे.
दिवसेंदिवस लहानग्यांबरोबर युवा वर्ग क्रीडा संकुल कडे व्यायामासाठी आकर्षित होत असताना या मैदानाची दुरावस्था पाहून या क्रीडा खात्याने या मैदानावर पसरलेल्या काटेरी गवत काढण्याकडे कसलेच लक्ष दिले नसल्याने सरावासाठी आलेले सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर त्याचप्रमाणे या भागातील भागातील युवा वर्गाने तालुका क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे क्रीडा संकुलावर मैदानात असणाऱ्या पाण्याच्या टाकी भोवती कुसळ गवताने पूर्ण वेढा टाकला असून त्या टाकीमध्ये एक थेंबही पाणी नाही. या क्रीडा संकुलाची अवस्था म्हणजे मोठे घर आणि पोकळ वासा या म्हणीप्रमाणे झाली आहे.
इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्री पदाच्या काळात या क्रीडा संकुलाची दुरावस्था दूर होण्यासाठी व क्रीडा क्षेत्रात या मैदानावरील खेळाडू राज्यातच नव्हे तर देश पातळीवर चमकावेत यासाठी विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे. क्रीडा संकुल दर्जेदार व्हावे यासाठी आवश्यक प्रमाणात निधीही दिला आहे. चांगला निधी देऊन इंदापूर तालुका क्रीडा संकुलाचे नाव पुणे जिल्ह्यात अग्रक्रमांकावर असावे, यासाठी भरघोस निधी देत विशेष लक्ष दिले होते. असे असतानाही संकुलावर प्रचंड कुसळाने थैमान घातले आहे. क्रीडा खात्याकडून काटेरी गवत का काढले जात नाही? युवकांच्या व सराव करणाऱ्या इतर जिल्ह्यातील पोलीस भरतीच्या सरावासाठी येणाऱ्या मुला मुलींच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे क्रीडा खात्याला दिसत नाही काय ? असा सवाल निर्माण झाला आहे.
सध्या या क्रीडा संकुलाकडे क्रीडा खात्याचे अधिकारी फिरतात की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकाला पडला आहे. संकुलात असणारी सौरऊर्जेवरील लाईटही बंद अवस्थेत आहे. त्यामुळे क्रीडा संकुलाची अवस्था म्हणजे आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातय अशी झाली आहे. युवा वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. इथे अनेक जण व्यायामासाठी येत असून क्रीडा संकुलाच्या मैदानावरील वाढलेले गवत काढावे, अशी मागणी ॲड. शामराव शिंदे यांनी केली आहे,तर बंद असलेले सौरदिवे चालू करावे अशी मागणी कृषी तज्ञ राजेंद्र वाघमोडे सर यांनी केली आहे. क्रीडा खात्याने आता तरी जागे होऊन तेथील वाढलेले गवत काढावे, अशी मागणी होत आहे..