बारामती : महान्यूज लाईव्ह
घटना बारामती तालुक्यातील माळेगाव येथील आहे. प्रेम विवाह केलेल्या दोघांचा प्रेम विवाह मंजूर नसल्याने मुलीच्या आई व भावाने प्रियकराच्या घरावर हल्ला केला. यात प्रियकराचे वडील गंभीर जखमी झाले आहेत, तर जोडप्याने मात्र पोलीस ठाण्यात जाऊन आम्ही प्रेमविवाह केल्याचे सांगून सज्ञान असल्याने पोलीस संरक्षण मिळवले आहे.
माळेगाव कॉलनीतील लक्ष्मी नगर येथील ही घटना असून येथील शेजारी शेजारी राहणाऱ्या मुलगा आणि मुलींमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले, मात्र दोन्ही कुटुंबाचा या लग्नासाठी विरोध होता. त्यामुळे मुलगा व मुलगी दोघांनी ठरवून पलायन केले आणि प्रेम विवाह केला.
या घटनेनंतर संतापलेल्या मुलीच्या आई व भावाने मुलीच्या प्रियकराच्या घरी जाऊन त्याच्या वडील व भावाला मारहाण केली. तातडीने मुलाला बोलावून घ्या अशी दमदाटी करत गुंडगिरीची भाषा वापरली. त्यावर मुलाच्या वडील आणि भावाने मुलगा कोठे आहे माहित नसल्याचे सांगितले.
त्यावर चिडून जाऊन मुलीच्या भावाने मुलाच्या भावाच्या डोक्यात दगड मारला. दगड लहान मेंदूस मारल्याने मुलांचा भाऊ जागीच बेशुद्ध पडला. यानंतरही मुलीच्या आई व भावाने लाथा बुक्क्यांनी त्याला मारहाण केली त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या मुलाच्या भाऊ व वडीलास अगोदर माळेगावातील दवाखान्यात व त्यानंतर बारामतीत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
त्यांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सुनिता चव्हाण व मयूर संजय चव्हाण यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली आहे. त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर इकडे नवविवाहित जोडपे पोलीस ठाण्यात स्वतःहून दाखल झाले आपण सज्ञान असल्याचे सांगत प्रेम विवाह केल्याचे सांगून त्यांनी पोलीस संरक्षण मिळवले आहे.