राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील खुटबावनजिक काल पोलिसांनी एक अल्पवयीन विवाह रोखला. मात्र लग्नात पोलिसांच्या एन्ट्रीने जे विघ्न आले, त्यात बिचाऱ्या पाव्हण्यारावळ्यांची मोठी गोची झाली.
दौंड तालुक्यातील एका मुलीचा बारामती तालुक्यातील नवरदेवाशी नियोजित विवाह होता. त्यासाठी खुटबावनजिकचे विवाहस्थळही ठरविण्यात आले होते. दोन्ही बाजूकडील मंडळी एकदम खुश होती.. ठरल्यानुसार सगळे बरे चालले होते.
काल (ता.२७) नवरीकडील मंडळींनी लग्नात द्यावयाच्या साऱ्या वस्तू, साहित्य विवाहस्थळी मांडले होते. आता सर्व सोपस्कार पार पाडायचे बाकी होते. तेवढ्यात माशी शिंकली.
नवरी मुलगी केवळ आठवी इयत्तेत शिकते, तिचे विवाहाचे वय नाही अशी खबर कोणीतरी पोलिसांना पोचवली. मग अल्पवयीन विवाह रोखण्यासाठी पोलिसांनीही तत्परता दाखवली.
पोलिस विवाहस्थळी पोचताच मोठा राडा झाला. नवरदेव व नवरीकडील काही मंडळींना पोलिसांनी जाब विचारला व ताब्यात घेतले. त्यांच्या नातेवाईकांना पोलिस ठाण्यात येण्याची सूचना केली आणि लग्नाचा बेरंग झाला.
आता काय होणार याचीच सर्वत्र चिंता पसरली. मग पोलिस आलेत, आपल्याला पकडतील या भितीने आलेल्या पाव्हण्या रावळ्यांनी दिसेल तो रस्ता आपला मानला आणि वाट दिसेल तिकडे निघाले.
लग्नात द्यावयाच्या साहित्याची पुन्हा गाडीत रवानगी करण्यासाठीही मोठी तारांबळ उडाली. पोलिसांनी दोन्ही बाजूंकडील लोकांना समज देऊन सोडण्यात आल्याची चर्चा असून एका लग्नात मात्र यापूर्वी झालेला खर्च आणि प्रत्यक्षात आलेले विघ्न यामुळे वर-वधू दोन्ही बाजूकडील वऱ्हाडी हवालदिल झाले होते.