सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – इंदापूरच्या मानव प्रशांत हेळकर याची नुकतीच एनडीएमध्ये (नॅशनल डिफेंस अकॅडमी) निवड झाली. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये त्याने ६९ वा क्रमांक पटकावला.
देशभरातील लाखो परीक्षार्थींमधून एकूण ५१९ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय सुरक्षा ॲकॅडमीसाठी निवड करण्यात आली. त्यात मानवने ६९ वा क्रमांक पटकावला. मानवचा परिवार मूळचा करमाळा (जि. सोलापूर) तालुक्यातील जेऊर येथील आहे.
मात्र त्याचा परिवार मागील ८ वर्षांपासून इंदापूर शहरात वास्तव्यास आहे. मानवचे वडील प्रशांत हेळकर हे इंदापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतिगृहाचे गृहपाल म्हणून ते कार्यरत आहेत.
मानवने आपले माध्यमिक शिक्षण सातारा येथील सैनिक स्कूलमधून, तर बारावी पर्यंतचे शिक्षण औरंगाबाद येथील एस.पी.आय कॉलेजमधून पूर्ण केले आहे. जिद्दीने सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्याने ही कामगिरी केली आहे. प्रशिक्षण पूर्ण करून तो लवकरच भारताच्या सशस्त्र दलात देशसेवेसाठी सज्ज होणार आहे.