सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : शेतकऱ्यांना यंदा अतिवृष्टी, अवकाळी व अस्मानी संकटाचा सामना करावा लागला, अशा परिस्थितीत इंदापूर तालुक्यात सध्या महावितरणकडून शेतक-यांना कोणतीही पुर्वसूचना न देता विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे या विषयावरून माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे वीज बील मुद्द्यावरून आक्रमक झाले.
शेतकऱ्यांची वीज बिल माफ करा अशी मागणी करत भरणे यांनी पुणे येथील खडकवासला कालवा व निरा डावा कालवा प्रकल्प सल्लागार समितीची बैठकीत आवाज उठविला. काल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खडकवासला कालवा व निरा डावा कालवा प्रकल्प सल्लागार समितीची बैठक पार पडली.
बैठकीस राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासह इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे, रणजितसिंह मोहिते पाटील, समाधान आवताडे, राम सातपुते, दिपक साळूखे, दिलीप मोहिते, अशोक पवार, सुनील शेळके, राहुल कुल, चेतन तुपे पाटील उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान भरणे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना यंदा अतिवृष्टी, अवकाळी तसेच अस्मानी संकटांचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. यामुळे आमच्या इंदापूर तालुक्यातील अनेक फळबागा तसेच इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेत शिवारात चार-चार महिने पाणी साचल्यामुळे वीजपंप बंद होते. मात्र असे असतानासुद्धा सरकार चालु वीजबिल भरण्याचा आदेश काढत आहे.
हे अत्यंत चुकीचे असून आता उन्हाचे प्रमाण वाढल्याने पिके पाण्याला आली आहेत. परंतु प्रशासनाने विद्युत पुरवठा खंडित केल्याने शेतीला पाणी देणे शक्य होत नसल्याने हाता-तोंडाशी आलेली पिक पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तातडीने विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी त्यांनी केली.
तसेच वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने लेखी आदेश देऊन विद्युत पुरवठा खंडित करू नका असा आदेश देण्याची मागणीही केली. भरणे यांच्या मागणीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महावितरणच्या अधिका-यांना वीज पुरवठा न तोडण्याचे सांगून याबाबतचा शासन स्तरावर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.