किशोर भोईटे- महान्यूज लाईव्ह
आपण करीत असलेले कोणतेही प्रामाणिक काम ही कदाचित पुण्याईच असते.. त्याचा प्रत्यय इंदापूर तालुक्यातील हिंगणेवाडी येथील पवार कुटुंबियांना आला.जेव्हा दिवंगत तानाजी पवार यांच्या कुटुंबियांसाठी ट्रॅक्टर वाहतूकदारांनी वर्गणी गोळा केली..!
तानाजी पवार हे कामगार छत्रपती कारखान्यात 22 वर्ष काम करीत होते. गव्हाणीच्या काट्यावर ते करीत असलेले काम प्रामाणिकपणे करत असल्याने ट्रॅक्टर वाहतूकदारांमध्ये ते परिचित होते.
काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका अपघातात अचानक त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मुलांचे शिक्षण तसेच भविष्यातील त्यांची सोय या साऱ्याच गोष्टींची चिंता त्यांना होती.
भवानीनगर येथील छत्रपती कारखान्यावर ऊस तोड करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वाहतूकदारांनी संवेदनशील मनाने निर्णय घेतला आणि त्यांची संघटना असलेल्या जयभवानी चालक -मालक ऊस वाहतूक संघटनेने एकत्रित येऊन लोकवर्गणी जमा केली.
ही लोकवर्गणी तब्बल सव्वा दोन लाख रुपये जमली. एवढी रक्कम या मुलांच्या शिक्षणासाठी मूलभूत खर्च म्हणून उपयोगी पडणार आहे.
पवार यांच्या कुटुंबाला एक आर्थिक हातभार म्हणून आणि सामाजिक कृतज्ञता व बांधिलकी म्हणून ही दोन लाख 25 हजार रुपयांची मदत तानाजी यांच्या पत्नी लता पवार यांच्याकडे सूपूर्त करण्यात आली. छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी या मदतीचे कौतुक केले.
यावेळी छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे कार्यकारी संचालक अशोक जाधव, ऊस वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील, कारखान्याचे संचालक अॅड. रणजित निंबाळकर, नारायण कोळेकर, डॉ. दीपक निंबाळकर, कुंदन देवकाते, वाहतूकदार संघटनेचे सचिव अनिल निकम, नितीन देवकाते, वसंत देवकाते, गणेश काटे, श्रीनिवास कदम, विष्णुपंत कदम सचिन डांगे आदी उपस्थित होते.