बारामती : महान्यूज लाईव्ह
ऐन पाण्याला आलेल्या पिकांच्या वेळी पुन्हा एकदा महावितरणने विज बिलांच्या थकबाकी वरून वीज जोड तोडल्याने संतप्त शेतकरी राज्यातील विविध गावांमध्ये दिसत आहेत. आज सकाळी मात्र बारामती तालुक्यातील काटेवाडीतील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्र घेतला आणि त्यांनी महावितरण जे कार्यालय गाठले.
त्यांनी महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयाला टाळे ठोकले, तर बारामती महावितरणचे कार्यकारी अभियंता धनंजय गावडे यांच्यासह स्थानिक शाखा अभियंता ठोंबरे यांना जोपर्यंत वीज जोडणार नाही, तोपर्यंत आम्ही तुम्हाला गावातून जाऊ देणार नाही असा पवित्रा घेत शेतकरी थांबलेले आहेत.
बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील महावितरणच्या कार्यालयात आज सकाळी गावातील शेतकरी गेले. त्यांनी वीज जोड तातडीने जोडून देण्याचा आग्रह धरला. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीज पंप जोडलेले आहेत, मग बारामती त्याला अपवाद कसा असू शकतो? असा सवाल त्यांनी शाखा अभियंता ठोंबरे यांना केला.
त्यावर ठोंबरे यांनी वरून आदेश आहेत, मात्र चालू बिल भरा लगेच वीजजोड जोडून देण्याची तयारी महावितरणची आहे, असे स्पष्ट केले. त्यावर शेतकऱ्यांनी नापसंती व्यक्त करत सरकार विरोधात घोषणा दिल्या. तसेच ठोंबरे यांना कार्यालयातून बाहेर येण्याची विनंती केली.
ठोंबरे कार्यालयातून बाहेर येताच त्यांनी कार्यालयाला कुलूप ठोकले आणि त्यानंतर तेथील पायऱ्यावर बसून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यानंतर कार्यकारी अभियंता धनंजय गावडे हे काटेवाडी येथे पोहोचले. तेव्हा शेतकऱ्यांनी कोणाचेही काही ऐकून घेणार नाही, पहिल्यांदा वीज जोड जोडा असा आग्रह धरला.
गावडे यांनी शेतकऱ्यांची चर्चा केली, मात्र शेतकरी संतप्त होते. जेव्हा कालव्याला पाणी येणार आहे, तेव्हाच तुम्हाला वीज जोड तोडण्याची अवदसा का उठली? असा सवाल शेतकऱ्यांनी करत जोपर्यंत वीज जोडून देणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला गावातून जाऊ देणार नाही असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला.