बारामती – महान्यूज लाईव्ह
प्रत्येक जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत रेशनचं गरीबांसाठी आलेलं धान्य परस्पर विकणाऱ्या दुकानदार, वाहतूकदारांवर अनेकदा कारवाया झाल्या.. पण त्याचा धाक काही केल्या दुकानदारांना बसत नाही.. हा नाहीतर तो दुकानदार हे धान्य विकतोच आहे..! वडगाव निंबाळकर पोलिसांनी तब्बल ३२५ पोती घेऊन जाणारा तांदळाचा ट्रक पकडला. पोलिसांनी ९ लाख ६० हजारांचा मुद्देमाल यामध्ये जप्त केला.
यासंदर्भात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी अधिक माहिती दिली. ५० किलोंची ३२५ पोती या कारवाईत पोलिसांनी जप्त केली आहेत. तर हा तांदूळ घेऊन जाणारा मालट्रक एमएच ११ एम ४४१५ हा देखील जप्त केला. या प्रकरणी किशोर एकनाथ सावंत (वय ४४ वर्षे, रा. लिंब, ता. जि. सातारा) या चालकासह संतोष जवाहरलाल शहा (वय ५१ वर्षे, रा. वडगाव निंबाळकर ता. बारामती) या व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या दोघांवर जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३(१)(२)(ड)(ई), ७(१)(अ) (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ टन रेशनिंगचा गहू काळ्या बाजारात खरेदी करून बेकायदेशीर रित्या विक्रीसाठी जात असताना बारामती निरा रस्त्यावर एका हॉटेलनजिक पोलिसांनी पकडला.
या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी पोपट नाळे यांनी फिर्याद दिली असून सहायक निरीक्षक सोमनाथ लांडे याचा पुढील तपास करीत आहेत.