मुंबई -महान्यूज लाईव्ह
तब्बल ३७ लाखांचे सोने तुळजाभवानीला अर्पण करणारे शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. तुळजाभवानीला नवस केला होता की, दोन्ही मुलांची लग्ने व्यवस्थित पार पडावीत.. ती पडली.. म्हणून त्यांनी देवीला ७५ तोळे अर्पण केले.
प्रताप सरनाईक मध्यंतरी ईडीच्या रडारवर होते. मात्र राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांची चौकशी थांबली. मध्यंतरी यासंदर्भात फार वादळ उठू नये म्हणून पुन्हा एकदा जुजबी चौकशी झाली. मात्र त्यानंतर प्रताप सरनाईक असोत किंवा भावना गवळी.. यांच्या चौकशीचे पुढे काय झाले हा प्रश्न अनेकांच्या मनात असतानाच आता प्रताप सरनाईकांचा नवस सगळ्यांच्या डोळ्यावर आला आहे.
प्रताप सरनाईक यांनी पादुका व हार असा ७५ तोळ्यांचा सोन्याच्या दागिन्यांचा साज देवीला अर्पण केला.
दोन वर्षांपासून आपल्याकडे हे दागिने तसेच होते, मात्र मंदिर बंद असल्याने तो नवस फेडता आला नव्हता असे सरनाईक म्हणाले आहेत. या नवसामध्ये मुलांच्या लग्नाबरोबर ईडीचे विघ्नही होते काय? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.
तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संजय राऊत यांच्या लग्नात फूलवाला, मेंदी काढणारा इथपर्यंत चौकशी करणाऱ्या ईडीला हे ढळढळीत ३७ लाख दिसत नाहीत का? असा सवाल केला, तर अमोल मिटकरी यांनी एका रिक्षाचालकाकडे थेट अर्पण करण्यासाठी ३७ लाखांचा निधी येतो कोठून? असा सवाल विचारला आहे.