बारामती – महान्यूज लाईव्ह
पाच वर्षापूर्वी काटेवाडीच नव्हे संपूर्ण राज्य ज्या गोष्टीने हादरले होते, त्या खटल्याचा आज बारामतीत निकाल लागला. आपल्याच वडीलांचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न पोटच्या पोरानेच केला होता. त्या अभय दिगांबर काटे यास बारामतीच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.
१२ मे २०१७ रोजी ही घटना घडली होती. या दिवशी दुपारी निरा डाव्या कालव्याच्या सणसरनजिक रायतेमळा येथे दिगांबर दादासाहेब काटे यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून करण्यात आला होता. व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांचा मृतदेह निरा डाव्या कालव्यात फेकून देण्यात आला होता.
या घटनेत सुरवातीला अनोळखी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तपासानंतर पोलिसांची संशयाची सुई मुलाकडे वळली होती. या घटनेचा तपास तत्कालीन सहायक निरीक्षक उत्तम भजनावळे व सहायक फौजदार प्रभाकर बनकर यांनी केला होता. पोलिसांनी अथक तपासानंतर अभय दिगांबर काटे याला अटक करून त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला होता.
या खटल्याची सुनावणी बारामतीच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधिश जे.पी. दरेकर यांच्यासमोर चालली. या खटल्यासाठी राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. राजेश कातोरे यांची नियुक्ती केली होती. तर काटे कुटुंबियांच्या वतीने अॅड. सचिन झालटे, एस.पी. सहाने, निलीमा खर्डे-पाटील, ज्ञानेश्वर जे. माने यांनी काम पाहिले. तर कोर्ट पैरवी सहायक फौजदार नामदेव नलवडे व डी.एस. जगताप यांनी सरकारी पक्षास सहकार्य केले.
या खटल्यात सरकारी वकील अॅड. कातोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकूण १३ साक्षीदार तपासले. परिस्थितीजन्य पुरावा व साक्षीदारांचे जबाब यावरून गुन्हा घडल्याचे निष्पन्न झाले. बचाव पक्षाने आरोपीला खोट्या गुन्ह्यात अडकवले जात असल्याचा युक्तिवाद केला. तर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सरकारी वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी अभय काटे यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
यामध्ये खूनाच्या गुन्ह्यात अभय याला जन्मठेप व १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. तर भादवि कलम २०१ मध्ये तीन वर्षे सश्रम कारावास, एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.
भादवि ५०६ (२) जीवे मारण्याची धमकी देणे व साक्षीदारांवर दबाव आणण्याच्या कलमाखाली तीन वर्षे सश्रम कारावास व पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांचा साधा कारावास, भादवि कलम २०३ अन्वये एक वर्षे सश्रम कारावास व पाचसे रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांचा साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली असून या सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत.