दौंडच्या पुर्व भागात वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटी उध्वस्त! महसूल विभागाची कारवाई!
राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्याच्या पूर्व भागात नायगाव – वाटलुज च्या हद्दीमध्ये भीमा नदीपात्रात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशावर दौंड व कर्जत तालुक्यातील महसूल विभागाने कारवाई केली आहे.
दौंड तहसीलदार संजय पाटील आणि कर्जत तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी भीमा नदीच्या पात्रात उतरुन ही कारवाई केली. नायगाव – वाटलुज परिसरात राजकीय वरदहस्ताने दिवस रात्र सुरु असलेल्या वाळू उपसा करणाऱ्या दोन फायबर,एक सेक्शन बोटी महसूल पथकाने जिलेटीनच्या साहाय्याने उडवुन नदीपात्रात बुडवल्या.
याप्रकरणी अंकुश ठोबरे ( रा. गणेशवाडी तालुका कर्जत, भरत आमणार (रा. मलठण ता.दौंड )यांच्यावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाव कामगार तलाठी नंदकुमार खरात यांनी ही फिर्याद दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.
मागील काही दिवसांपासून या भागात स्थानिक वाळू चोरांनी उच्छाद मांडला होता. यांत्रिक बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा करून हायवा ट्रक च्या सहाय्याने वाळू वाहतूक केली जात होती. यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्याने कारवाई केली जात नव्हती.
मात्र दौंड तहसीलदार संजय पाटील कर्जतचे तहसीलदर नानासाहेब आगळे, मंडल अधिकारी मंगेश नेवसे, संतोष जाधव ,नितीन मकत्तेदार, गावकामगार तलाठी संतोष इडॊळे, सचिन जगताप, दीपक आजबे, नंदकुमार खरात आदी महसूल विभागाच्या पथकाने नदीपात्रात उतरून आक्रमक भूमिका घेत हा कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.