सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेच्या इंदापूर तालुका महिला संघटकपदी तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिता नानासाहेब खरात यांची निवड करण्यात आली.
नुकतेच पुणे येथे एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदचे अधिवेशन पार पडले. यावेळी आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार व एमआयटी- पुणे शिक्षणसंस्था समूहाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, राष्ट्रीय सरपंच संसदचे प्रमुख योगेश पाटील आदी प्रमुखांच्या उपस्थितीत अनिता नानासाहेब खरात यांना एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेच्या इंदापूर तालुका महिला संघटक या पदाची जबाबदारी देण्यात आली.
निवडीचे नियुक्तीपत्र भारती पवार व राहुल कराड यांच्या हस्ते अनिता खरात यांना देण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना अनिता खरात म्हणाल्या,शाश्वत व सर्वांगीण ग्रामविकास प्रक्रियेत पंचायत राज व्यवस्थेचे मोठे योगदान आहे. देशाच्या पंचायतराज व्यवस्थेतील सर्व लोकप्रतिनिधींचे अराजकीय स्वरूपात संघटन करणे, त्यांचे प्रबोधन करणे, विविध उपक्रमांचे अभ्यासपूर्ण संयोजन करून त्यांना ग्रामविकास प्रक्रियेत सहकार्य करणे हे एमआयटी- राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तेजपृथ्वी ग्रुप व इंदापूर तालुका महिला दक्षता समितीच्या माध्यमातून सामाजिक काम करत असताना मी जातीभेद न करता गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, विद्यार्थी यांना न्याय देण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. दिलेली जबाबदारी मी निष्ठेने पार पाडेल.
इंदापूर मार्केट कमिटीचे माजी उपसभापती पांडुरंग मारकड व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके यांनी निवडीबद्दल अनिता खरात यांचे अभिनंदन केले आहे.