सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – इंदापूर शहरातील कुरेशी मोहल्ला परिसरात अनधिकृत बांधकामावरती इंदापूर नगरपरिषदेने कारवाईचा बडगा उगारत कसलीही परवानगी न घेता करण्यात आलेली बांधकामे आज (बुधवार) पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केली.
ही माहिती माहिती मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी दिली. इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्या उपस्थितीमध्ये पोलिस बंदोबस्तात करण्यात आलेल्या या कारवाईत जेसीबीच्या मदतीने बांधकामे पाडली गेली.
मात्र काही बांधकामांना स्थानिकांनी विरोध दर्शवल्याने यंत्रणेला रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागले. अर्थात यानंतरच्या काळात तांत्रिक त्रुटी टाळून धडक कारवाई करण्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले.
आज इंदापूरात या कारवाईची मोठी चर्चा होती. पोलिसांनी कारवाईला जाताना केलेल्या संचालनामुळे या परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती.