दौंड – महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्राचे विभाजन करायचं पाप करणारा एक प्रस्ताव कर्नाटक सरकारने दिलेला आहे त्याचा मी जाहीर निषेध करते असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी कर्नाटक सरकारचा निषेध केलाच, शिवाय यामागे भाजप असल्याचा दावा करीत महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावला जात असल्याबद्दल भाजपवरही टिकास्त्र सोडले.
आज दौंड तालुक्यातील नंदादेवी येथे पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी वरील निषेध व्यक्त केला. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावे कर्नाटकला जोडण्याचा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला आहे. त्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे.
यासंदर्भात विचारले असता सुळे म्हणाल्या,` आता हळूहळू असं वाटायला लागले की इंग्रजांचं राज्य परत आले आहे. कारण जनरल डायर जसे होते, जसा त्यांनी भारतातील सगळ्यांवर अन्याय केला तसाच एक कोणीतरी जनरल डायरने ठरवलं की महाराष्ट्राचं वाटोळंच करायचं.
आपल्या हक्काच्या नोकऱ्या दुसऱ्या राज्यात गेल्या, आपल्या हक्काचा जीएसटी हा दुसऱ्या राज्यात गेला. कुठलीही मोठी गुंतवणूक होणार असेल तर ती दुसऱ्या राज्यात कशी जाईल याचंच कट कारस्थान खरंतर महाराष्ट्राच्या विरोधात कोणीतरी करीत असून ते एक मोठे षड्यंत्र आहे. माझा तर थेट आरोप इडी सरकारवर आहे.
ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील काही गावांची कर्नाटकने मागणी केली आहे, किमान महाराष्ट्रातल्या ईडी सरकारने याचा तत्परतेने निषेध तरी करायला हवा होता.
त्यामुळे या ईडी सरकारला आता सत्तेमध्ये राहायचा अधिकारच नाही. कारण त्यांच्याच विचाराच्या पक्षाची सत्ता ही कर्नाटकमध्ये आहे. त्याच्यामुळे हे जनरल डायर आणि हे जे इंग्रजांचे सरकार आलेलं आहे.. ज्यांनी महाराष्ट्राची आता फाळणी करायचं पाप हळूहळू सुरू केले आहे.
यांनी आधी महात्मा ज्योतिबा फुले यांचा अपमान केला. त्यानंतर छत्रपतींचा अपमान सातत्याने करतात आणि आता महाराष्ट्राचा विभाजन करायचं कटकारस्थान आणि षडयंत्र हे दिल्ली, कर्नाटक, कुठून कुठून येते मला माहिती नाही पण यांच्यासाठी महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राची जनता काहीच नाही. पण आम्ही हे सहन करणार नाही. कितीही कष्ट करायला लागलं तरी चालेल, रस्त्यावर उतरू, पण असं विभाजन आम्ही कधीही होऊ देणार नाही.