पुणे महान्यूज लाईव्ह
एखादी गोष्ट घडल्यानंतर किती दिवसांत त्याची तक्रार व्हावी याचा काही नियमच राहीला नाही. मी-टू प्रकरणानंतर कोणतीही महिला कधीचीही विनयभंगाची, अत्याचाराची तक्रार देताना आपण अनेकांनी पाहिले, आता तब्बल ९ वर्षांनी ३ कोटींची आपल्या वडीलांची फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर चुलतभावांनी चुलतभावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
उदय भाऊसाहेब वाघेरे (रा. पिंपरी) याने चुलता सुदाम वाघेरे यांच्या धनादेशाचा वापर करून त्याद्वारे आपल्या खात्यात पैसे फिरवल्याचा आरोप यामध्ये असून पोलिसांनी आर्थिक फसवणूकीसह इतर कलमांखाली उदय वाघेरे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार सन २०१० ते २०१३ या कालावधीत घडल्याची तक्रार सुदाम वाघेरे यांच्या मुलीने व मुलाने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
उदय वाघेरे याने चुलते सुदाम वाघेरे यांच्या पवना बॅंक खात्यातील धनादेश वापरून ३४ लाख रुपये व आरटीजीएसद्वारे २ कोटी ९९ लाख रुपये जमा केले व त्यानंतर लागलीच हे पैसे इतरांच्या खात्यावर फिरवले. पुढील तपास पिंपरी चिंचवड पोलिस करीत आहेत.