डहाणू : महान्यूज लाईव्ह
ही कहाणी आहे पालघर जिल्ह्यातील.. गावच्या ग्रामसभेपूर्वी शाळेत काही समस्या आहेत का? याची विचारणा करण्यासाठी सरपंच शाळेमध्ये गेला. दुर्दैव सरपंचाचे की, त्याचवेळी शिक्षक मात्र निवांत बाकावर पहुडला होता. त्यांचे ‘चिंतन’ सुरू होते.
हे वेगळेच चित्र पाहून सरपंचचा पारा चढला. त्यांनी त्याची विचारणा करताच झोपलेल्या शिक्षकाचा इगो जागा झाला आणि त्याने मागेपुढे न पाहता सरपंचाला बेदम चोपला..
डहाणू तालुक्यातील धामणगाव आपटोलपाडा येथील शाळेत ही घटना घडली. या घटनेत सरपंच दिनेश वरखंडे यांना वसंत ठाकरे या शिक्षकानज बेदम मारहाण केले. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
गावातील काही नागरिकांनी शाळेत सुरू असलेल्या विचित्र स्थितीबद्दल सरपंचाला माहिती दिली होती. त्याचप्रमाणे शाळेतील काही अडचणी देखील सांगितल्या होत्या. या नेमक्या अडचणी काय आहेत याची माहिती घेण्यासाठी सरपंच वरखंडे हे शाळेत पोहोचले.
तेव्हा तिथे त्यांना एक शिक्षक भेटले. यावेळी दुसरे शिक्षक कुठे आहेत? अशी विचारणा केल्यानंतर त्या शिक्षकांनी अगदी सहजपणे शाळेसमोर झाडाकडे बोट दाखवले. झाडाखाली असलेल्या बाकावर वसंत ठाकरे शिक्षक निवांतपणे झोपलेला होता.
मात्र सरपंच तिथे आल्याचे कळतच ठाकरे तिथून उठले आणि त्यांनी सरपंच वरखडे यांना तुला सरपंच पदावर राहायचे आहे का? अशी विचारणा करत, तुला माहित नाही मी कोण आहे ते अशी दमबाजी केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
याप्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात सरपंच दिनेश वरखंडे यांनी तक्रार दाखल केली. दरम्यान हा शिक्षक मद्यपी असल्याची चर्चा गावात सुरू असून, गावातील शाळेत मुले असलेल्या पालकांनी देखील या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली.