दिल्ली महान्यूज लाईव्ह
ईडीने महाराष्ट्र किंवा भाजपविरोधी सत्ता असलेल्या राज्यांमध्ये दाखवलेल्या भितीचा परिणाम एवढा झाला की, आता ईडीचा अधिकारी बोलतोय या नावाखाली टोळ्या व त्यांच्याकडून खंडणी वसुलीही सुरू झाल्यात. मुंबईतील एका व्यापाऱ्याला ईडीची भीती दाखवून १५ ते २० कोटींची सक्तीने वसुली करण्याचा इरादा होता. मात्र दिल्लीतील दिल्ली पोलिसांनी ही टोळी पकडली.
दिल्ली क्राईम ब्रॅंचचे विशेष आयुक्त रवींद्र यादव यांनी यासंदर्भात माहिती दिली. या टोळीतील अखिलेश मिश्रा, दर्शन हरीश जोशी, विनोदकुमार पटेल धर्मेंद्रकुमार गिरी, नरेश महातो, असरार अली, विष्णूप्रसाद, देवेंद्रकुमार दुबे व गजेंद्र नावाचा व्य्कती यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील एका व्यापाऱ्याला ईडीची बनावट नोटीस पाठवून त्याच्याकडून १५ ते २० कोटी सक्तीने वसूली करण्याचा या टोळीचा इरादा होता. यासंदर्भात निप्पॉन इंडिया पेंटस या कंपनीचे अध्यक्ष हरिदेव सिंह यांनी तक्रार दिली.
हरिदेव सिंह यांना ईडीकडून नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यांच्याविरोधात एक खटला दाखल केला जाणार असून लवकरच त्यांच्यावर मोठे संकट कोसळेल अशी बतावणी ईडीचा एजंट म्हणवल्या जाणाऱ्याने केली होती.
या एजंटाने नोटीस मिळाल्यानंतर हरिदेव सिंह यांच्या सहकाऱ्यास आरोपी अखिलेश मिश्रा याने आम्ही तुमची मदत करू असे सांगितले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा स्पीड पोस्टाने हरिदेव सिंह यांना ईडीची नोटीस मिळाली. त्यांना शंका आली. त्यांनी आरोपींशी संपर्क केला. सुरवातीला आरोपी अखिलेश मिश्रा, दर्शन हरीश जोशी, विनोदकुमार पटेल धर्मेंद्रकुमार गिरी, नरेश महातो, असरार अली, विष्णूप्रसाद, देवेंद्रकुमार दुबे व गजेंद्र यांनी आपण ईडीशी संबंधित असल्याचे सांगत पहिल्यांदा २ ते ३ कोटींची खंडणी मागितली. त्यानंतर ९ ते १४ नोव्हेंबर दरम्यान दिल्लीत भेटण्यास सांगितले.
त्यानंतर हरिदेवसिंह यांनी ११ नोव्हेंबर रोजी दर्शन हरिश जोशी याच्याबरोबर संपर्क केला व नोटीस रद्द करण्याची विनंती केली. त्यानंतर हा प्रकार मिटविण्याचे जोशीने आश्वासन दिले. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी अखिलेश मिश्रा व दर्शन जोशी यांनी हरिदेव सिंह यांच्यासमवेत मुंबई विमानतळावर चर्चा केली.
या चर्चेदरम्यान सिंह यांच्याकडील हजारो कोटींच्या बेनामी संपत्तीची माहिती ईडीला मिळाली असून हा सारा घोटाळा काही कोटींमध्ये मिटवला जाऊ शकतो असे या दोघांनी सांगितले. त्यासाठी आम्हाला दिल्लीला जावे लागेल असे सांगून विमानाची तिकीटे बुक करण्यास सांगितले व १४ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये बैठक घेऊ, तेथे २० कोटी घेऊन या असे सांगितले.
त्यानंतर हरिदेव सिंह यांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला व पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार दिल्ली पोलिस सतर्क झाले व त्यांचे एक पथक अशोका हॉटेल येथे पोचले. त्या पथकाने अखिलेश मिश्रा व दर्शन जोशी यांना हॉटेलच्या बाहेरच ताब्यात घेतले. तेव्हा त्यांचे इतर तीन साथीदार हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर केलेल्या छापेमारीत विनोद पटेल, धर्मेंद्र गिरी व नरेश महातो यांना अटक करण्यात आली.
यानंतर दिल्लीच्या विविध भागात उर्वरित सर्व साथीदारांना पकडण्यात आले. निजामुद्दीन भोगल येथे केलेल्या छापेमारीत नववा आरोपी गजेंद्र उर्फ गुड्डू याला पकडले व त्यांच्याकडून एक मारुती सियाज गाडीही जप्त केली.
स्पेशल २६ चित्रपट पाहिला होता.. भामट्यांनी..!
गंमत म्हणजे यातील अखिलेश हा उत्तर प्रदेशातील बलिया येथील असून तो मुख्य सूत्रधार आहे. दर्शन जोशी हा रसायनांचा विक्रेता असून विनोदकुमार पटेल हा राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे. धर्मेंद्रकुमार गिरी रियल इस्टेट ब्रोकर आहे. नरेश महातो हा ट्रान्सपोर्ट कंपनी चालवतो, तर असगर अली लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे. विष्णू प्रसाद हा माजी खासदाराचा पीए असून देवेंद्रकुमार दुबे हा आसाम रायफल्समध्ये नोकरीला आहे. गजेंद्र हा टॅक्सी चालक आहे. देवेंद्रकुमार याने आपण इडीचे संचालक आहोत अशी बतावणी केली होती.