बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील पदार्थविज्ञान विषयाचे प्राध्यापक डॉ. रमेश देवकाते यांचा यावर्षीच्या स्टॅनफर्ड विद्यापीठाने जारी केलेल्या जागतिक संशोधकांच्या यादीत समावेश झाला आहे.
दरवर्षी जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची यादी अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठाकडून जाहीर केली जाते. यावर्षी त्यांनी घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. देवकाते यांचा समावेश केला आहे.
डॉ. देवकाते हे महाविद्यालयात सहायक प्राध्यापक या पदावर कार्यरत असून त्यांना संशोधनातील १५ वर्षा्ंचा अनुभव आहे. त्यांनी पदार्थविज्ञान या विषयात कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाकडून पीएचडी मिळवली असून प्रा. के. वाय. राजपुरे व प्रा. सी.डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदवी मिळवली आहे.
स्टॅनफर्ड विद्यापीठातील अभ्यासकांकडून जगभरातील संशोधकांच्या संशोधन कार्याचा सांख्यिकीय अभ्यास करून कोम्पॉसिट इंडिकेटर काढला जातो व त्याआधारे ही यादी तयार केली जाते.
देवकाते यांनी सौरऊर्जा, सुपरकॅपॅसिटर, बॅटरी व वॉटर स्प्लिटींग इत्यादी बाबींवर संशोधन केले असून संशोधन क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानाबद्दल सन २०१९ साली भारत सरकारच्या भास्करा अडवान्सड सोलर एनर्जी (BASE) फेलोशीप प्रोग्रॅम यामध्ये त्यांची निवड झाली होती.
विशेष म्हणजे यासाठी पूर्ण देशातून फक्त ६ जणांची निवड करण्यात आली, त्यापैकी ते एक होते. या फेलोशीप अंतर्गत त्यांनी अमेरिकेतील मिसुरी युनिव्हर्सिटी सायन्स अँड टेक्नॉलॉजी येथे पदव्युत्तर पदवी संपादन केली. त्यांनी भारत सरकारकडून आणि विद्यापीठ स्तरावरून आजवर संशोधन प्रकल्पासाठी तब्बल ४३ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४ विद्यार्थी पीएचडीचे संशोधन करीत आहेत.
यावर्षी सायन्स अँड इंजिनीरिंग रिसर्च इंजिनीरिंग बोर्ड (SERB) यांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या टीचर्स असोसिएटशिप फॉर रिसर्च एक्सलन्स (TARE) या फेलोशीपसाठीही त्यांची निवड झाली आहे.
या अंतर्गत इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स (IISC), बंगलोर या ठिकाणी बॅटरी साठी लागणाऱ्या पदार्थावर ते ३ वर्षे संशोधन करणार आहेत. डॉ. देवकाते यांनी संशोधन क्षेत्रात मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत शिंदे यांनी सत्कार केला. यावेळी उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, डॉ. श्यामराव घाडगे यांच्यासह सर्व विषयाचे विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.