फक्त तीनच आरोपी जेरबंद! तेही स्थानिक गुन्हे शाखेने, दौंड पोलीसांचे मात्र हातावर हात!
राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड शहरातील हिंदू खाटीक समाजातील महिलांना व कुटुंबांना मारहाण करणे विनयभंग व ॲट्रोसिटी या गंभीर गुन्ह्याती मुख्य संशयित आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता आणि माजी नगराध्यक्ष बादशह शेख अद्याप फरारच असुन त्याला पकडण्यात दौंड पोलिसांना अद्याप अपयश आले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचा नेता आणि माजी नगराध्यक्ष बादशाह शेख याला अटक करण्याच्या मागणीसाठी भाजप आमदार नीतेश राणे यांनी १७ नोव्हेंबरला दौंड मध्ये येऊन पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला होता. याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत राणे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. यावेळी या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना ४८ तासांची मुदत दिली होती.
आमदार राणे यांनी दिलेली ४८ तासाचा अवधी संपला आहे. ४८ तासात या गुन्हेतील इलियास इस्माईल शेख (वय ३१), वाहिद जावेद खान (वय २१) व सुफियान उर्फ जुम्मा रमजान शेख (वय २०, तिघे रा. कुंभार गल्ली, दौंड) असे फक्त तीन आरोपी तेही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केले आहेत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी बादशाह शेख हा ९ नोव्हेंबर पासून फरार आहे.
याला अटक करण्याच्या मागणीसाठी आमदार नितेश राणे यांनी मोर्चा काढला, पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरत आर्थिक लागेबांधे सारखे गंभीर आरोप ही केले. तो मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. ४८ तासांत मुख्य संशयित आरोपी बादशहा शेख हा मात्र पोलीसांच्या हाती सापडला नाही, पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची मात्र ४८ तासाच्या आत तडकाफडकी बदली झाली.
दरम्यान,या गुन्ह्याचा तपास हा दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्याकडे असताना केवळ विनोद घुगे यांचीच तडकाफडकी बदली का करण्यात आली ? पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांची बदली ही प्रशासकीय बाब आहे, असे कारण दिले असले तरीही हे कारण मात्र शहरातील सर्वसामान्य नागरिकांना न पटणारे आहे. घुगे यांची बदली केवळ राजकीय दबावामुळे करण्यात आल्याची चर्चा दौंड शहरात रंगली आहे.