रोहतक – महान्यूज लाईव्ह
निवडणूकीत हार-जीत आलीच.. अर्थात एका मताने पराभव झाला तरी तो पराभवच आणि एका मताने किंवा अगदी चिठ्ठीने जरी विजयी झाला तरी तो विजयीच उमेदवार असतो.. पराभवाचं शल्य मात्र अनेक वर्षे त्या पराभूत उमेदवाराच्या मनात कायम सलत राहतं.. हरियाणात मात्र अशी घटना घडलीय की, जिथे सरपंचपदाची निवडणूक हरलेल्या उमेदवाराला गावाने सन्मान करीत चक्क २ कोटी ११ लाख रुपये रोख व एक आलिशान कार भेट दिली.
या आगळ्यावेगळ्या, विचित्र सन्मानाची सध्या देशभर चर्चा होतेय. त्याचे कारण म्हणजे रोहतक जिल्ह्यातील चिडी या गावातील गावकऱ्यांनी हा पायंडा पाडला आहे. हे गाव माजी मुख्यमंत्री भूपींदरसिंह हुड्डा यांच्या किलोई मतदारसंघात येते.
या गावात नुकतीच ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांची निवडणूक झाली. १२ नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली. या गावातही महाराष्ट्राप्रमाणेच सरपंचपद हे जनतेतून होते. या सरपंचपदाच्या निवडणूकीत नवीन दलाल या उमेदवाराने धर्मपाल या उमेदवाराचा अवघ्या ६६ मतांनी पराभव केला. या गावात अत्यंत चुरशीने मतदान झाले.
अर्थात धर्मपाल या उमेदवाराचा पराभव तर झालाच होता. मात्र गावकऱ्यांनी धर्मपाल यांना पुन्हा ताकद देण्याचे ठरवले आणि चक्क २ कोटी ११ लाख रुपये रोख व एक आलिशान कार भेट दिली.
गावकऱ्यांनी कोणत्याही उमेदवाराने खचून जाऊ नये यासाठी केलेला हा सन्मान होता, तर या सन्मानाने धर्मपाल यांनाही दिलासा मिळाला. अशा प्रकारचे प्रेम पाहून मी सदगदीत झालो असल्याचे धर्मपाल यांनी माध्यमांना सांगितले.