विक्रम वरे – महान्यूज लाईव्ह
बारामती – महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याबद्दल बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रीय नेते शरद पवार, सोनिया गांधी आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे जोपर्यंत महाविकास आघाडीला आशीर्वाद आहे तोपर्यंत महाविकास आघाडीला किंचितही काही धोका नाही अडचण नाही असे अजित पवार म्हणाले.
सावरकरांच्या बाबतीत ते म्हणाले, मला त्या बाबत काही बोलायचं नाही. कारण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली. महत्वाचे विषय महागाई, बेरोजगारी हे प्रश्न इतके मोठ्या प्रमाणावर आपल्या सगळ्यांच्या समोर उभे आहेत. महाराष्ट्रातले महत्त्वाचे प्रकल्प परराज्यात चाललेले आहेत, ते कसे थांबतील या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे.
मधल्या काळामध्ये रब्बीच्या पण पेरण्या अडचणीत आल्या. पिके अडचणीत आली, खरीपाची पिके अडचणीत आली आणि म्हणून जी काही मागणी शेतकरी वर्गाकडून झालेली आहे. ओला दुष्काळ किवा जी काही मदत मिळायला पाहिजे किंवा पिक विम्याचे पैसे मिळाले पाहिजे हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे महत्त्वाचे प्रश्न सोडून वेगवेगळे प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण केले जातात. ज्या गोष्टीला अनेक वर्ष झालेली आहेत त्या गोष्टीचा उल्लेख करून त्या व्यक्तीचा उल्लेख करून नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीच करू नये. असं माझं स्पष्ट मत आहे.
राष्ट्रवादीने स्टार प्रचारकांच्या यादीतून खासदार अमोल कोल्हे यांचे नाव वगळल्याच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, मला त्याबद्दल काही माहिती नाही. मी त्याबद्दलची माहिती घेतो. मध्यंतरी पण यासंबंधी बातमी आली होती. बातम्या आल्यानंतर मी डॉ. कोल्हे यांच्याशी संपर्क साधला होता. आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत.
शिंदे सरकार सत्तेमध्ये आल्यापासून विकास कामांना स्थगिती देत आहे. याबद्दल बोलताना म्हणाले, काही विकासकामांना स्थगिती काही बाबतीमध्ये दिलेली आहे. विशेषतः महाविकास आघाडीच्या कामांना स्थगिती दिली. आता काही कामांना उड्डाणपूल,पूल व अन्य कामांना स्थगिती देण्यात आलेली आहे. ही स्थगिती उठलेली आहे.
वास्तविक ज्या कामांना विधीमंडळची मान्यता मिळाली आहे, सभागृहाची मान्यता मिळाली आहे. अशी कामे थांबवणे उचित नाही. हे मी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना प्रत्येक भेटीत सांगत आलो आहे. तुम्ही तुमचे नवीन काम मंजूर करा. त्या कामाला गती द्या. त्याबद्दल आमचे दुमत नाही. परंतु मागील विकासाची कामे थांबवण्याचेही काही कारण नाही.
जो १४५ आमदारांचा पाठिंबा मिळतो तो सरकार स्थापन करतो हे आजपर्यंत अनेकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे आत्ताच्या राज्यकर्त्यांनी कायम आपणच सत्तेत राहणार नाही. हे लक्षात ठेवून विरोधकांना सापत्नभावाची वागणूक देवू नये. तसेच कोणाला किती निधी द्यावा याचा अधिकार राज्यकर्त्यांचा आहे. त्यांच्या सदविवेकबुद्धीला स्मरून ते काम करत आहेत. आता त्यात काय योग्य- अयोग्य हे जनतेने ठरवावे असेही पवार म्हणाले.