बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामती शहरात कॅफेच्या नावाखाली जो धांगडधिंगा सुरू आहे, तो कोण रोखणार अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. आज अप्पर पोलिस अधिक्षकांनी पहिला मोर्चा या कॅफेंकडे वळवला. शहरातील एमआयडीसी चौकात आज दुपारी अचानक पोलिस अधिकाऱ्यांची वाहने मॉलपासून कॉर्नरपर्यंत सगळीकडे वळली आणि कॅफेचालकांबरोबर कॅफेमध्ये वेळ
घालवायला गेलेल्यांचीही बोबडी वळली.
अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे यांनी पदाची सूत्रे स्विकारल्यानंतर काही ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या कानावर शहरातील ही बिघडत चाललेली बाब घातली होती. आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा शहरात दौरा होता. दुपारी एक वाजता अजित पवार हे त्यांचे कामकाज आटोपून विद्या प्रतिष्ठानमधून बाहेर पडताच पोलिस अधिकाऱ्यांची वाहने देखील दुसऱ्या बाजूने बाहेर पडली. भोईटे यांच्यासमवेत उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, प्रभारी पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे होते.
अभिमन्यू कॉर्नरनजिक कॅफे नजरेला पडताच पोलिसांनी त्याला पहिले लक्ष्य केले. खुद्द अप्पर पोलिस अधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, प्रभारी पोलिस निरीक्षकच स्वतः कॅफेमध्ये शिरून कॅफे कसा आहे, त्याची बैठक व्यवस्था कशी केलीय याची पाहणी करीत होते.
शहरातील तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन तीन वर्षात अचानकच कॅफेची संख्या वाढली आहे. कॅफे हा मजा करायचा आणि व्यावसायिकासाठी पैसे कमवायचा मोठा धंदा बनला आहे. आतमध्ये अंधार, बसण्यासाठी दडगी जागा, चोरटे कप्पे, आणि प्रायव्हसी अशी सुविधा ज्या कॅफेमध्ये अधिक चांगली, त्या कॅफेला अधिक पसंती असे चित्र असल्याने कॅफेंची रचना अधिकाधिक प्रायव्हेट होऊ लागली आहे आणि असे कॅफे शहरात वाढू लागले आहेत.
आज एकापाठोपाठ एक असे कॅफे पोलिसांनी धुंडाळायला सुरवात केली. सुभद्रा मॉलमध्ये दहा पेक्षा अधिक कॅफे आहेत, त्यांची तपासणी झाल्यानंतर अप्पर पोलिस अधिक्षकांनी बेकायदेशीररित्या असलेल्या कॅफेंवर कारवाई करण्याचे आदेश दिले. एकाही कॅफेमध्ये आतील गुप्त रचना राहणार नाही, हे सर्व कॅफे उपहारगृहाप्रमाणेच राहतील याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना दिल्या.
दरम्यान आज काही प्रेमी युगुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या पालकांना याची समज दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे कॅफेचालकांवर कारवाई केली जाणार असल्याची माहितीही पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. आज पोलिसांनी केलेल्या या भन्नाट कारवाईचे तरुणाईने देखील स्वागत केले. उघड्या डोळ्यांनी हा नंगानाच पाहवत नसल्याची प्रतिक्रिया येथील स्थानिक नागरिकांनी दिली.