नगर – महान्यूज लाईव्ह
विनायक सावरकर यांच्या कथित माफीनाम्यावर भाजप व मनसेचे नेते राहूल गांधींसह उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेवर तुटून पडले आहेत. मात्र यातील कोणीही हर हर महादेव चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला म्हणून बोलले नाहीत? यातील कोणीही राज्यपालांचा निषेध करीत नाही.. ही महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांच्या प्रत्येक युवकांच्या मनातील सल आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी बोलून दाखवली.
जामखेडमध्ये पत्रकारांशी बोलताना पत्रकारांच्या प्रश्नावर रोहित पवार यांनी भाजप, मनसेला खिंडीत गाठले. ते म्हणाले, माझा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी फारसा अभ्यास नाही. त्यामुळे त्या विषयावर मी काहीही वक्तव्य करणार नाही, मात्र जेव्हा या राज्याचे राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराजांबाबत खालच्या पातळीवर जाऊन बोलले, महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासंदर्भात अत्यंत घाणेरडे बोलले, तेव्हा हे भाजप, मनसेवाले का काहीच बोलले नाहीत?
हर हर महादेव या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या बाबतीत खोटा इतिहास दाखवला गेला आहे, त्यातून दिशाभूल केली गेली आहे, मात्र त्याबाबत ते काहीच बोलत नाही. म्हणजेच तुम्ही फक्त एकाच महापुरूषावर व एकाच विषयावर बोलायचे ठरवले आहे व इतर थोर व्यक्तींबाबत बोलत नाही हे उचित नाही. हे जाणीवपूर्वक आहे का हे लोकांना कळलेच पाहिजे.
राहूल गांधींनी जे सावरकरांचे पत्र दाखवले, ते मी वाचलेले नाही, सावरकरांचे पुस्तक मी वाचलेले नाही. मात्र इतिहास मला माहिती असल्याने आम्ही हर हर महादेव चित्रपटाबद्दल बोललो. चुकीच्या दाखवलेल्या गोष्टींचा विरोध केला, तर तेव्हा भाजपचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, गळ्यामध्ये फलक लावायचा, पिक्चर दाखवण्याच्या चित्रपटगृहाच्या ठिकाणी उभे राहायचे, मग चर्चा करायची असे ते बोलले. मग मला म्हणायचे आहे की, जर
इतिहास बदलला असेल, चुकीचा दाखवला असेल आणि त्याला विरोध केला जात असेल तर मला वाटते, येत्या काळात सावरकर यांच्या बाबतीतही एक चर्चासत्र ठेवावे. त्यांचा नक्की खरा काय इतिहास होता, हे दाखवावे. मग यात दूध का दूध पाणी का पाणी होईल.
राजकीय विरोध करण्यापेक्षा आमच्या व पुढील पिढीला यात चर्चा व्हावी असे वाटते. खरा इतिहास काय हे समोर आलाच पाहिजे. पुस्तकात काय आहे, पत्रात काय आहे हे खरे समोर आले पाहिजे. छत्रपती शिवाजी राजांचा खोटा इतिहास दाखवला, तेव्हा आम्ही विरोध केला, सावककरांचा खरा इतिहास समोर आणा, मग लोक सपोर्ट करतील ना.
पत्रकारांच्याच एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात मिळत असलेल्या प्रतिसादामुळे दररोज असे विषय काढून यात्रेचे महत्व कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची टिका केली. ते म्हणाले, भारत जोडोला ज्या पध्दतीने प्रतिसाद मिळत आहे, त्या प्रतिसादामुळे सारे सत्ताधारी घाबरले.
७ नोव्हेंबर रोजी राहूल गांधी महाराष्ट्रात आले, तेव्हापासून सुरवातीच्या दिवशी भिडेंचे टिकली प्रकरण, त्यानंतर अब्दूल सत्तारांनी सु्प्रियाताईंच्या बाबतीत जाणीवपूर्वक केलेले वक्तव्य, जितेंद्र आव्हाड यांच्यावर लागोपाठ केलेले दाखल गुन्हे आणि आता सावककर यांचा मुद्दा हे सारे पाहिले की, लगेच लक्षात येते.
उगीचच काहीतरी जाणीवपूर्वक वक्तव्ये करायची, त्यावरच चर्चा घडवायची आणि या यात्रेकडे लक्ष जाऊ द्यायचे नाही हे त्यांनी ठरवले होते.