राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड: दौंड पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची बदली राजकीय दबावामुळे झाली नसून तो एक प्रशासकीय कामाचा भाग आहे, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.
दौंड शहरात मागील काही दिवसांपासून हाणामारी विनयभंग यासारख्या घटनांमुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांच्यासह इतरांवर विनयभंग व ॲट्रॉसिटी सारखे गंभीर गुन्हे दाखल झाले होते. हे गुन्हे दाखल होऊनही आरोपींना अटक केले नसल्याने व पोलीस स्टेशन आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनेने केला होता.
या पार्श्वभूमीवर काल गुरुवारी (दि.१७) भाजपा आमदार नितेश राणे यांनी दौंड पोलीस ठाण्यावर शहरात मोर्चा काढत पोलीस प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला होता. यावेळी आमदार राणे यांनी बादशाह शेख यांच्यासह इतर आरोपींना ४८ तासाच्या अटक करण्याचा अल्टिमेटम दौंड पोलिसांना दिले होते. मात्र आमदार नितेश राणे यांनी दौंड सोडताच काही तासांतच दौंड पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.
त्यांच्या अचानक बदलीमुळे दौंड शहरात विशेषतः पोलीस दलात खळबळ उडाली. पोलीस निरीक्षक घुगे यांच्या बदली मागे फरार आरोपी माजी नगराध्यक्ष बादशाह शेख हे जरी निमित्त असले तरीही मात्र घुगे यांच्या बदलीची डाळ मागील तीन-चार महिन्यांपासून राजकीय वर्तुळात शिजली जात होती. आणि शेवटी घुगे हे राजकीय व्यवस्थेचे बळी ठरले गेले अशी चर्चा सुरू होती.
त्याच पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी (दि. १९) पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दौंड पोलीस ठाण्याला भेट दिली. पोलीस ठाण्याचे कारागृह तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामकाजाचा आढावा घेत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले की, दौंड शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल. कायदा सुव्यवस्था व सामाजिक सलोखा जपण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. कोणत्याही गुन्हेगारांना पाठीशी घातले जाणार नाही, संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. दौंड पोलीस ठाण्याला चांगला पोलीस अधिकारी दिला देण्यात आला आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारचं कामकाज केले जाईल.
त्यांच्या कामकाजाबाबत काही शंका असेल किंवा समाधान न झाल्यास थेट माझ्याशी संपर्क करावा असे आवाहन ही यावेळी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले. तर पोलीस निरीक्षक विनोद यांच्या बदली संदर्भातल्या प्रश्नावर बोलताना म्हणाले की, घुगे यांची बदली हे राजकीय किंवा कोणत्याही दबाव मुळे झाली नसून तू एक प्रशासकीय कामाचा भाग असून प्रशासकीय कारण आहे. त्यांच्याबाबत काही दिवसांपूर्वी अहवाल प्राप्त झाल्याने, त्यानुसार ही बदली करण्यात आली अशी माहिती यावेळी दिली. याप्रसंगी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, दौंड पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील हे उपस्थित होते.