पुणे – महान्यूज लाईव्ह
पुण्यात मोलमजूरी करणाऱ्या आईवडीलांनी लहान मुलीला उत्तर प्रदेशात गावी पाठवले आणि तिथे चुलत्याने, मग आजोबाने अत्याचार केले.. एवढे कमी की काय, जेव्हा ही मुलगी पुन्हा पुण्यात परतली, तेव्हा वडीलांनीही अत्याचार केले.. ही घटना महाविद्यालयाच्या समुपदेशकाला संबंधित पिडीत तरुणीने सांगितली. यावरून पोलिसांनी वडीलांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
मात्र या घटनेवरून समाजात संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून एवढा किळसवाणा प्रकार कसा घडू शकतो हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. यातील खरे कारण समोर आले पाहिजे अशाही प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या असून अलिकडे घडीव फिर्यादी अधिकच येऊ लागल्याने आता अशा किळसवाण्या प्रकारांबाबत पोलिसांनीही लागलीच गुन्हा दाखल करताना किमान त्यातील सत्य जाणून घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सन २०१६ ते १८ या कालावधीत उत्तर प्रदेशात गावी गेलेल्या संबंधित पिडीत मुलीवर ३३ वर्षीय तिच्या चुलत्याने जबरदस्ती केली. मग वर्षभर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिच्या आजोबांनीही कसर ठेवली नाही. आजोबांनीही तिचे वारंवार चुंबन घेत तिच्याशी अश्लील चाळे केले. या दरम्यान वारंवार विरोध केल्याचे या पिडीतेचे म्हणणे आहे.
त्याहूनही किळसवाणी बाब म्हणजे जेव्हा ही मुलगी पुन्हा पुण्यात सन २०१८ मध्ये आली, तेव्हा तर तिच्याच जन्मदात्या बापाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आई बाहेर गेल्यानंतर वडील तिच्यावर अत्याचार करायचे अशी माहिती या पिडीतेने समुपदेशकाला दिल्यानंतर सारेच हादरून गेले.
पुण्यात शाळा, महाविद्यालयातील मुलींसाठी समुपदेशनाची मोहिम काही ठिकाणी संस्थांनी सुरू केली आहे. त्याअंतर्गत मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय तज्ज्ञ शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना समुपदेशन करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जेव्हा हे समुपदेशक या महाविद्यालयात गेले, तेव्हा आता १७ वर्षांची असलेल्या या अल्पवयीन पिडीतेने ही माहिती दिली. त्यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने वडीलांविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.