सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
छत्रपती कारखान्याची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची चिन्हे आहेत आणि आता हळूहळू कारखान्यात सत्ताधारी व विरोधकांमध्ये कलगीतुरा वाढू लागला आहे. कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सत्ताधाऱ्यांवर मोठा बॉम्बगोळा टाकत पुराव्यानिशी कारखान्यात १६ कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी मात्र काहीही अयोग्य झालेले नाही, वेळेनुसार योग्य निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
पृथ्वीराज जाचक यांनी दोन महिन्यापूर्वी कारखान्याच्या संचालक मंडळाने केलेल्या विक्री व्यवहाराची माहिती दिली आहे. यामध्ये दोन महिन्यापूर्वी संचालक मंडळाने कच्ची साखऱ ३ हजार २७५ रुपये प्रतिक्विंटल दराने व पक्की साखर ३ हजार ३१० रुपये प्रतिक्विंटल दराने विकली. तर ४० हजार टन मळीची विक्री ६ हजार २५० रुपये टनाप्रमाणे अगाऊ विक्री केली, म्हणजेच चालू गळीत हंगामात उत्पादन होणारी मळी आधीच विकली असे त्यांचे म्हणणे आहे.
गेली दोन वर्षे हा प्रकार सुरू असून कोणताही बाजारपेठेचा अभ्यास न करता हा प्रकार झाला असल्याचे जाचक यांचे म्हणणे आहे. अगाऊ कोणतेही उत्पादन विकले की, तोटा होतो हे आपण वारंवार सांगत होतो असे जाचक म्हणत असून त्याच्या पुष्ठ्यर्थ त्यांनी आता वाढलेल्या साखरेच्या दराची माहिती दिली.
आता कच्च्या साखरेचे प्रतिक्विंटल दर ३ हजार ७२० रुपये व पक्क्या साखऱेचे म्हणजे एस-३० साखरेचे दर ३ हजर ७७५ रुपये झाले आहेत. म्हणजेच कच्च्या साखरेमागे प्रतिक्विंटल ४४५ रुपये तर पक्क्या साखऱेमागे प्रतिक्विंटल ४६५ रुपये कमी मिळाले आहेत. मळीचे आजचे दर ८ हजार रुपये प्रतिटन असून १७५० रुपये कमी मिळाले आहेत.
याचा विचार करता मळीमध्ये ७ कोटी, पक्क्या साखरेमघ्ये ४.६५ कोटी तर कच्च्या साखरेमध्ये ४.४५ कोटी रुपये कारखान्याचे नुकसान झाले आहे. १६.१० कोटींचे हे नुकसान झाले, त्याची जबाबदारी कोणाची असा सवाल जाचक यांनी केला आहे.
कारखान्यात घेतलेला योग्य वेळचा तो योग्यच निर्णय – काटे
दरम्यान जाचक यांच्या आरोपानंतर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. साखर व मळी विक्रीबाबत केलेले आरोप हे वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे असून त्या-त्या वेळच्या प्राप्त परिस्थितीचा विचार करून साखर व मळी विक्रीबाबत संचालक मंडळाने घेतलेला निर्णय योग्यच आहे असा दावा प्रशांत काटे यांनी केला.
ते म्हणाले, या वर्षीचा गळीत हंगाम सुरू करणेपूर्वी मशिनरी ओव्हरहॉलिंग व मेन्टेनन्सची कामे, ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा भरती करणे, केमिकल, बारदाना खरेदी, कर्मचार्यांचे पगार इत्यादीसाठी जवळपास 47-00 कोटी रुपयेची आवश्यकता होती. त्याकरिता संचालक मंडळाने बँकांकडून रक्कम उपलब्ध करणेसाठी प्रयत्न केला व जिल्हा बँकेनेसुद्धा कारखान्यास जेवढी मदत करता येईल तेवढी मदत केली आहे.
परंतु रिझर्व्ह बॅंकेच्या निर्बंधामुळे बँकेकडून एवढी मोठी रक्कम विनातारण उपलब्ध होऊ शकत नसलेने संचालक मंडळाने मळी व साखर आगाऊ विक्री करणेचा निर्णय घेतला आहे. गेली 2 ते 3 महिन्यापासून कारखाना सदरची रक्कम बिनव्याजी वापरत आहे. यामध्ये कारखान्याचा फायदाच झाला आहे.
म्हणजे एक विचार केला, तर सदरची रक्कम बँकेकडून घेतली असती तर त्याकरिता 12 टक्के व्याज भरावे लागले असते व साखर व मळी विक्रीबाबतचा निर्णय घेतला नसता तर कारखान्याचा गळीत हंगाम चालू करणे अडचणीचे झाले असते. मागील दोन हंगामातही आपण तशा पद्धतीचे निर्णय घेतलेमुळे आपल्याला गळीत हंगाम घेता आले व उच्चांकी गाळप करता आले.
साखर व मळीचे आता बाजारभाव वाढले असून साखर व मळीच्या आगाऊ विक्री केल्यामुळे कारखान्यास तोटा आला, असा आरोप करण्यात आला आहे. शेवटी बाजारपेठेत चढ-उतार होत असतो. पाठीमागे श्री. जाचक हे संचालक मंडळाचे सभेस उपस्थित राहत होते. त्यावेळी हंगाम चालू करणेच्या दृष्टीने कारखान्यास पैशाची आवश्यकता होती व बँकेकडून पैसे उपलब्ध होत नसलेने श्री. जाचक यांचे संमतीने मळीची आगाऊ विक्री करणेबाबत निर्णय घेण्यात आला होता.
त्यावेळी त्यांनी कारखान्यास पैशाची उपलब्धता होत नसेल तर जेवढ्या पैशाची आवश्यकता आहे, तेवढ्या प्रमाणात मळीची आगाऊ विक्री करावी, असे सूचित केले होते. तसेच साखरेचे दर वाढल्याचे कारण देऊन काही साखर कारखान्यांनी साखर विक्रीचे करार मोडले असले तरी सदर कारखान्यांनी प्रति क्विंटल 100 रुपये प्रमाणे ई. एम. डी. घेऊन करार केले आहेत. परंतु आपले कारखान्याने प्रति क्विंटल 1 हजार 100 रुपयांप्रमाणे ई. एम. डी. घेतली आहे.
सध्या कारखान्याचे गाळप सुरळीतपणे चालू असून आत्तापर्यंत 1 लाख 35 हजार 58 टन उसाचे गाळप होऊन 1 लाख 14 हजार 900 क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. कारखान्याची दैनंदिन रिकव्हरी 9-38 टक्के व सरासरी रिकव्हरी 9-22 टक्के इतकी आहे.
हा गाळप हंगाम सुरळीतपणे पार पाडणेसाठी कारखान्याचे सर्व सभासद, अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदार, ऊस तोडणी मजूर यांचे चांगले सहकार्य मिळत आहे व येथून पुढचा गळीत हंगाम यशस्वीरीत्या पार पाडणेसाठी अशाच प्रकारचे सहकार्य सर्वांनी करावे व सभासदांनी आपलेच कारखान्यास ऊस गळितास देऊन सहकार्य करावे असे आवाहन प्रशांत काटे यांनी केले आहे.