दौंड – महान्यूज लाईव्ह
काल भाजप व हिंदूत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला आणि रात्री विनोद घुगेंची अचानक बदली झाली. दौंडच्या पोलिस ठाण्याची सूत्रे आता भाऊसाहेब पाटील यांनी घेतलीत. या बदलीनंतर खरोखरच विनोद घुगे कोणाला नको होते? आणि नक्की कोणता बादशहा या बदलीमागे पडद्याआडून सूत्रे हलवत होता याचीही चर्चा सुरू आहे.
काल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दौंडमध्ये बादशहा शेख याच्या अटकेच्या मागणीसाठी मोर्चा काढला. तसेच दौंड शहरातील एका हल्ल्याच्या घटनेतील आरोपींनाही अटक करण्यात आली नव्हती अशीही तक्रार यावेळी झाली होती. या साऱ्या गोष्टींबरोबरच दौंड शहरातील अंतर्गत राजकारणाचाही पैलू कालच समोर आला होता.
सत्ता बदलली की, सारेच समीकरण बदलते. विनोद घुगे हे राजकीय नेत्यांच्या ऐकण्यात नव्हते, अशीही चर्चा येथे सुरू असून घुगे अलिकडच्या काही महिन्यांमध्ये अडचणीचे बनले होते. आता नगरपरीषदेचीही निवडणूक होणार आहे, या साऱ्याच पार्श्वभूमीवर येथील समीकरणे बदलली होती. त्यात बादशहा शेख प्रकरण आले.
बादशहा शेख याच्यावर गुन्हा दाखल होऊन एवढे दिवस उलटल्यानंतरही पोलिसांनी बादशहा शेख याला अटक केली नाही. भलेही बादशहा शेख माजी नगराध्यक्ष व वजनदार राजकीय नेता असेल, मात्र त्याला मिळालेली सूट ही खरोखरच सामान्य नागरिकालाही मिळाली असती का? असाही सवाल येथे उपस्थित केला जात होता. त्यामुळे या घटनेतील प्रत्येक बाबीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. त्याचीही परिणिती घुगे यांच्या बदलीत झाल्याची चर्चा येथे सुरू आहे.
दरम्यान आता दौंडची सूत्रे स्विकारलेल्या भाऊसाहेब पाटील यांनी यापूर्वी दौंड तालुक्यातच काम केले असल्याने त्यांना येथील कामाचा अनुभव आहे. त्यांची येथे नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी त्यांना रात्रीच सूत्रे स्विकारण्या्च्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाऊसाहेब पाटील यांनी दौंड शहर पोलिस ठाण्याची सूत्रे स्विकारली आहेत.