विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : जिद्द चिकाटी आणि मेहनत करायची तयारी असेल तर यश निश्चित मिळते. व ध्येय नक्कीच गाठता येते. हे पुन्हा एकदा शेतकरी पुत्राने सिद्ध करून दाखविले आहे.
बारामती तालुक्यातील गोजूबावी येथील कांतीलाल दिलीप गरगडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या मोटार वाहन निरीक्षक परीक्षेमध्ये यश मिळविले आहे. भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गात त्यांनी राज्यात पहिले व सर्वसाधारण प्रवर्गात सहावे स्थान मिळविले आहे.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुले मुली लाखो रुपये भरून क्लास लावतात. परंतु कांतीलाल गरगडे यांनी कोणताही स्पर्धा परीक्षेचा क्लास न लावता घरीच अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. कांतीलाल गरगडे यांचे वडील शेतकरी असून आई शेती कामामध्ये मदत करते. त्यांच्या या यशामुळे गावातील युवकांना प्रेरणा मिळाली आहे.
कांतीलाल गरगडे यांचे दहावीचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल गोजुबावी येथे झाले आहे. बारावीचे शिक्षण विद्या प्रतिष्ठान आर्ट, कॉमर्स,सायन्स कॉलेज बारामती व इंजिनीअरिंग चे शिक्षण एस. बी. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इंदापूर येथे झाले.
शेतकरी पुत्राने मोटार वाहन निरीक्षक परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या यशातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. तसेच अपयशाने खचून न जाता अभ्यासाला परिश्रमाची जोड दिल्यास यशाचे शिखर गाठता येते हे कांतिलाल गरगडे यांनी दाखवून दिले आहे. परिस्थिती नसताना कांतीलाल गरगडे यांनी यशाचे शिखर गाठून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
‘महान्यूज’शी बोलताना त्यांनी सांगितले की आईवडील, भाऊ, बहिण, शिक्षक, मित्रांनी मार्गदर्शन केल्याने यश मिळाले़.व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू असून अजून मोठ्या पदाला गवसणी घालणार असल्याचे सांगितले.