दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड राष्ट्रवादीचा नेता आणि दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांच्यावर ॲट्रॉसिटी आणि विनयभंगा सारखे गंभीर गुन्हे दाखल असताना पोलिसांनी अद्याप अटक का केले नाही? पुढील ४८ तासात आरोपी बादशहा शेख त्याच्यासह इतर आरोपींना पोलिसांनी अटक केले नाही तर कायदा हातात घ्यावा लागेल. यापुढे कोणत्याही हिंदूंवर अन्याय सहन केला जाणार नाही. असा इशारा आमदार नितेश राणे यांनी पोलीस प्रशासनाला दिला.
दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते बादशाह भाई शेख यांच्यावर एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून विनयभंग प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल होऊन दहा-बारा दिवसाचा कालावधी उलटूनही पोलिसांनी अद्याप बादशाह शेख यांना अटक केले नाही.
या संदर्भात आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी (दि १७) पीडित महिला व कुटुंबाची भेट घेतली. यावेळी पीडित महिला व कुटुंबासहित भाजप आमदार नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत दौंड पोलीस स्टेशन ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी आमदार राणे यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरले.
यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार राणे म्हणाले की, हिंदूवर अन्याय करणाऱ्या बादशाहला पोलीस का अटक करत नाही? पोलिसांचे अर्थपूर्ण लागेबंधे असल्याने पोलिसांनी या बादशहाला फरार दाखवले आहे, या बादशहाची दौंड शहरात दहशत असल्याने एका हिंदू खाटीक समाजाच्या पीडित महिला व कुटुंबाला न्याय देण्यासाठी एक हिंदू म्हणून मी दौंड मध्ये आलो आहे.
या पीडित कुटुंबाला मी ताकद देणार असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे, या बादशहाला कोणी पाठीशी घालायचा त्याला घालू दे, यापुढे या बादशहाने दौंड शहरात हिंदूवर दहशत करण्याचा प्रयत्न केला तर त्याची दौंड शहरातून धिंड काढू असा इशारा राणे यांनी दिला.
पुढील ४८ तासांचा अवधी पोलिसांना दिला आहे. पोलिसांनी या बादशहाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये हे महाविकास आघाडीचे सरकार नाही तर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे. हे हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे, देवेंद्र फडणीस हे राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणीस यांच्याशी या संदर्भात चर्चा करणार असून या प्रकरणाची सीआयडी मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी मी त्यांच्याकडे करणार आहे, आगामी हिवाळी अधिवेशनात मी हा मुद्दा उपस्थित करणार आहे. असेही आमदार राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.