सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
मागील वर्षीच्या एफआरपीपेक्षा २०० रुपये प्रतिटनी जास्त ऊसदर व यावर्षीची एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १७ व १८ नोव्हेंबर रोजी राज्यातील कारखाने बंद ठेवण्याचे जाहीर केले होते, आज सकाळी छत्रपती कारखान्याने हंगाम बंद ठेवला.
आज सकाळी साडेसात वाजता कारखान्याचे गाळप बंद करण्यात आले, दरम्यान सोमेश्वर व माळेगाव कारखान्याचे गाळप मात्र सुरू होते, तसेच कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्याचेही गाळप नियमितपणे सुरू होते, मात्र कर्मयोगी कारखान्याने उसाची तोडणी बंद केल्या आहेत, तोडून आलेला ऊस गाळप केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राजू शेट्टी यांनी राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन ऊसदराबाबत भूमिका स्पष्ट केली होती व त्यानंतर साखर आयुक्तालयावर मोर्चा काढला होता. त्याचवेळी राज्य सरकारने यावर वेळीच निर्णय घेतला नाही, तर येत्या १७ व १८ नोव्हेंबर रोजी राज्यातील कारखाने बंद ठेवण्याचा इशारा दिला होता.