बारामती – महान्यूज लाईव्ह
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती संचलित, शारदाबाई पवार महिला आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त
विद्यमाने दहाव्या राज्यस्तरीय स्वयंसिद्धा युवती संमेलनास सुरवात झाली.
१६ ते १९ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत होत असलेल्या या संमेलनासाठी राज्यातील ९२ महाविद्यालयातून १८७३ विद्यार्थीनी व ४७ प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला आहे. या संमेलनाचे उदघाटन देशातील सुप्रसिध्द सामाजिक कार्यकर्त्या, सर्पतज्ज्ञ व सोयरे वनचरे मल्टीप्रपोज फाउंडेशन संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा व नारीशक्ति राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त वनिता बोराडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या सविता व्होरा या होत्या. उद्घाटनपर भाषणात बोराडे म्हणाल्या, रोजच्या कामामुळे आपण आपल्याला ओळखू शकत नाही, स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःला ओळखा. स्वतःला ओळखल्यानंतर आपण आपल्या जीवनाची चांगल्याप्रकारे वाटचाल करू शकतो.त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल थोडक्यात सांगून सर्प व वन्यप्राण्यांविषयी माहिती सांगितली.
साप हा शेतकर्याचा मित्र आहे, त्यांना मारू नका, सापांना २० फुटापेक्षा जास्त लांबचे दिसत नाही, साप दिसल्यानंतर शांत उभे रहा, तो आपोआपच निघून जाईल, साप कधीही माणसावर जाणीवपूर्वक हल्ला करीत नाही, साप फार भित्रा प्राणी आहे. स्वतःला वाचविण्यासाठी तो माणसांना दंश करतो, साप कधीही मागून येऊन दंश करीत नाही, आपण आपल्या अज्ञानामुळे सापांना मारतो.
नागपंचमीला नागाला पूजायचे आणि वर्षभर त्याला ठेचून मारायचे हे चुकीचे आहे. माणसांप्रमाणे साप व इतर प्राण्यांनाही पृथ्वीवर जगण्याचा, राहण्याचा अधिकार आहे. साप हा मांसाहारी प्राणी आहे. त्याला दूध पाजू नका, तो कधीही दूध पित नाही. सापाला दूध पाजले तर तो पचवू शकत नाही. खूपच तहान लागल्यावर पाणी समजून दूध पितो आणि मरतो, म्हणून सापांना दूध पाजू नका.
अध्यक्षीय भाषणात सौ. व्होरा यांनी उपस्थित स्वयंसेविकांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, विद्यार्थिनींनो इतर महाविद्यालयातील विद्यार्थिनींशी बोला, चर्चा करा, इतरांचे प्रश्न-समस्या जाणून घ्या. लोकांना काय वाटते, लोक आपल्याला हसतील या विचारणे आपण व्यक्त होत नाही हा संकुचितपणा सोडून व्यक्त व्हा. जिजाऊ, अहिल्यादेवी व सावित्रीबाई यांना समजून घ्या. या तीन स्त्रियांना समजून घेऊन ज्या स्त्रिया आपल्या जीवनाची वाटचाल करतील त्या कधीच चुकणार नाहीत.
या उद्घाटन सोहळ्यासाठी ट्रस्टचे प्रमुख श्री राजेंद्र पवार, विश्वस्त सौ. सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्राचार्य श्री. निलेश नलावडे, संस्था समन्वयक श्री. प्रशांत तनपुरे, संस्थेच्या मनुष्यबळ विकास अधिकारी दत्ता गार्गी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकुमार महामुनी, स्वयंसिद्धा युवती संमेलनाचे समन्वयक प्रा. राजकुमार देशमुख, विद्याथी विकास अधिकारी प्रा. रोहिदास लोहकरे, सायन्स विध्याशाखा प्रमुख डॉ. परिमिता जाधव, कला व वाणिज्य विध्याशाखा प्रमुख प्रा. आनंदराव कदम, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. यशवंत डुंबरे संस्थेतील सर्व पदाधिकारी, विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्राचार्य डॉ. श्रीकुमार महामुनी यांनी स्वयंसिद्धा युवती संमेलनाची उद्दिष्टे सांगितली तसेच स्वयंसिद्धा युवती संमेलनाचे समन्वयक प्रा. राजकुमार देशमुख यांनी चार दिवसांच्या कार्यक्रमांची रुपरेषा विद्यार्थिनींना सांगितली. सूत्रसंचालन डॉ. आश्लेषा मुंगी यांनी व आभार प्रा. रोहिदास लोहकरे यांनी मानले.