जुन्नर – महान्यूज लाईव्ह
तंबाखू खाण्यासाठी आईकडे पैसे मागितल्यानंतर आईने पैसे दिले नाहीत, म्हणून तंबाखूच्या अगदीच आहारी गेलेल्या दिवट्याला एवढा राग आला की, त्याने फक्त दहा रुपयाच्या तंबाखूसाठी जन्मदात्या ६० वर्षीय आईच्या डोक्यात खोरेच घातले. या खोऱ्याचा घाव वर्मी लागल्याने आईचा पटकन जीव गेला आणि दिवट्या पोलिसांनी ताब्यात घेतला.
ही घटना जुन्नर तालुक्यातील शिरोळी तर्फे आळे येथे घडली. या घटनेत अंजनाबाई बारकू खिल्लारी या ६० वर्षीय महिलेचा जीव गेला. या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी २३ वर्षीय मुलगा अमोल बारकू खिल्लारी याला अटक केली.
या प्रकरणी बारकू सखाराम खिल्लारी यांनी नारायणगाव पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अमोल याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. मा्त्र या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली.
यासंदर्भात सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमोल खिल्लारी याला तंबाखूचे व्यसन होते. त्याने आई अंजनाबाई यांच्याकडे पैसे मागितले. पैसे कशासाठी हवेत असे विचारल्यानंतर तंबाखू खाण्यासाठी पैसे हवेत असे म्हणताच अंजनाबाई यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने अमोलला राग अनावर झाला आणि त्याने शेजारीच पडलेल्या खोऱ्याचा घाव थेट अंजनाबाईंच्या डोक्यात घातला. डोक्यात वर्मी घाव लागल्याने अंजनाबाईंना गंभीर जखम होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला.