जेजूरी महान्यूज लाईव्ह
जेजूरीनजिक असलेल्या इंडियन सीमलेस मेटल ट्यूब्ज लिमीटेड या कंपनीत लोखंडाचा रस नेणारा लॅडल तुटून लोखंडाचा तप्त रस अंगावर पडून ८ कामगार जखमी झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये ४ कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ही घटना सोमवारी सकाळी घडल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली असून या घटनेत क्रेनचा चालक जितेंद्र सिंग, सुजीत बरकडे, दुर्गा यादव, शिवाजी राठोड, मनोरंजन दास, आकाश यादव, अरूण सिन्हा, चुनेज बरकडे आदी कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर जेजूरीत उपचार सुरू आहेत. तर गंभीर जखमी झाल्याने जितेंद्र सिंग याला पुण्याला हलविण्यात आले आहे.
दरम्यान वायररोप तुटल्याने तप्त व द्रवरुपातील लोखंडाचा रस वाहून नेणारा लॅडल खाली पडला व ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात असले तरी कंपनीकडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान हा लॅडल तुटताना कंपनीतील पक्षी देखील या तप्त लोहरसाच्या संपर्कात आले आणि त्यांची एका क्षणात राखरांगोळी झाली.