बारामती – महान्यूज लाईव्ह
तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथे ऊस तोडणीसाठी आलेल्या ऊसतोड मजूरांच्या तळावरील झोपडीबाहेर असलेल्या तीन वर्षीय चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. मात्र बारामतीच्या डॉ. मुथा बापलेकांनी या मुलाला संवेदनशील माणूसकी दाखवत मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.
कोऱ्हाळे बुद्रुक येथे नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून सोमेश्वर कारखान्यासाठी ऊस तोडणीसाठी ऊसतोड मजूर आले आहेत. सोमवारी संध्याकाळी या मजूरांपैकी एका मजूर कुटुंबातील तीन वर्षाचा मुलगा युवराज राठोड हा झोपडीबाहेर खळत होता.
अचानकच तेथे आलेल्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. त्याच्या तोंडाला, अंगाला चावे घेत जखमी केले. ही घटना पाहताच तेथील मजूर त्याच्या मदतीला धावून गेल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र या घटनेत युवराज गंभीर जखमी झाला.
त्याला अगदी धावत पळतच बारामतीत आणण्यात आले. बारामतीत डॉ. राजेंद्र मुथा व सौरभ मुथा यांच्या श्रीपाल दवाखान्यात आणल्यानंतर त्याची अवस्था पाहून डॉक्टरही गहिवरले. दरम्यान तातडीने आणल्याने या मजूरांकडे पैसे नव्हते.
मात्र डॉक्टरांनी अगोदर उपचाराला सुरवात केली व आवश्यक औषधे व साहित्य पुरवले. यानंतर डॉ. मुथा पितापुत्रांसह दंतरोगतज्ज्ञ डॉ. आशुतोष आटोळे यांनी युवराजवर शस्त्रक्रिया केली. तब्बल ५५ टाके घालावे लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.