बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामतीत दुकानदारांवर दहशत माजवून त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी गल्लोगल्ली दादा तयार होऊ लागले आहेत. ११ नोव्हेंबर रोजीही अशीच घटना कसब्याच्या फलटण चौकात घडली. बारामतीत युवका्ंची वाढत असलेली दादागिरी व त्यांचा उच्छाद आता सहनशीलतेच्या पलीकडे चालला आहे, अशातच शहर पोलिसा्ंनी या टोळीला अटक करून व्यावसायिकांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे.
११ नोव्हेंबर रोजी बारामतीतील कसबा फलटण चौकात आदेश संजय कुचेकर व त्याचे साथीदार साहिल सिकिलगर, ऋषिकेश चंदनशिवे, तेजस बच्छाव, यश जाधव यांनी हॉटेल दुर्वाज मधील हॉटेल चालकावर व कामगार यांचे दहशत बसवण्यासाठी व त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी हॉटेलमध्ये तोडफोड केली व हॉटेल चालकाच्या डोक्यात धारदार तलवारीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
यातील फिर्यादीला डोक्यात मोठी जखम झाली. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी ऋषिकेश चंदनशिवे व तेजस बच्छाव यांना अटक केली. मात्र आदेश कुचेकर हा गुन्हा करून मुंबई येथे फरार झाला होता. त्याच्या पाळतीवर पोलिस होते. तो काल त्याच्या घरी आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली.
या सर्व आरोपींवर जीवे मारण्याचा प्रयत्न, खंडणी, घराविषयी आगळीक व दंगल या प्रकरणी (307,384,427,143,147,149 सह आर्म act 4,25) या कलमांखाली गु्न्हे दाखल केले आहेत.
आदेश कुचेकर व त्याची गॅंग या भागात वारंवार गुन्हे करते व त्यांच्यामुळे सदर परिसरात भीतीचे वातावरण असल्याने त्यांच्यावर काही दिवसातच संघटित गुन्हेगारी थोपवण्यासाठी करावी लागणारी आवश्यक व कठोर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली आहे.
दरम्यान या आरोपींना पकडण्याची कामगिरी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहायक निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, पोलीस शिपाई तुषार चव्हाण, पोलीस शिपाई जामदार, व राणे यांनी केली आहे
या आदेश कुचेकर याने काही महिन्यापूर्वी नितीन वाईन्स या दुकानावर सुद्धा तोडफोड करून हल्ला केलेला होता तसेच कसब्यातील एका युवकालाही मारहाण केलेली होती व ज्या दिवशी हा गुन्हा केला त्याच दिवशी त्यांनी चैत्राली बारमध्ये सुद्धा धुडगूस घातलेला होता, परंतु भीतीपोटी अनेक व्यवसायाचे तक्रार देत नाहीत तरी त्यांच्या कुणाच्या तक्रारी असतील त्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क करावा असे आवाहन महाडिक यांनी केले आहे.