ठाणे – महान्यूज लाईव्ह
भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाची तक्रार दाखल केल्यानंतर आमदारकीचा राजीनाम्याची घोषणा केलेल्या आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे कोर्टाने अटी व शर्तीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला.
ठाण्यातील पूल उदघाटनाच्या कार्यक्रमानंतर जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून पुढे जात असताना भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याला हाताने बाजूला सारले. त्यावरून या महिला पदाधिकाऱ्याने आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
त्यावरून ७२ तासांत दोन गुन्हे दाखल केल्याने वैतागलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी थेट आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. त्यावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच पेटले.
यानंतर आव्हाड यांनी अटकपूर्व जामीनासाठी ठाणे कोर्टात अर्ज सादर केला. याची सुनावणी आज झाली. सुनावणीदरम्यान पोलिस उपायुक्त सोनाली ढोले यांनी आव्हाड यांच्या जामीनास विरोध केला.
आरोपी बलाढ्य राजकीय व्यक्ती आहे, त्याला अटकपूर्व जामीन दिल्यास गुन्ह्यावर परिणाम होईल असे सांगितले. दरम्यान आव्हाड यांच्या वतीने गजानन चव्हाण यांनी युक्तीवाद करताना तो व्हिडीओच थेट दाखवला. यामध्ये त्यांनी युक्तीवाद करून झाल्यानंतर सोनाली ढोले व सरकारी वकीलांनी याच व्हिडीओवरून युक्तीवाद केला की, व्हिडीओ पाहिला, तर जाणीवपूर्वक ढकलले आहे, महिलेने तक्रारीत तिचा खांदा जोरात दाबल्याचे म्हटले आहे. जर ओळखीची महिला होती, तर तोंडाने सांगता आले असते, हाताने बाजूला करणे योग्य आहे का? अद्याप अनेक साक्षीदार तपासायचे आहेत, त्यामुळे अटकपूर्व जामीन देऊ नये अशी मागणी केली.
यावर दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने आव्हाड यांच्या वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य मानून अटकपूर्व जामीन दिला. १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर व पोलिसांना तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर हा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.