पुसद – महान्यूज लाईव्ह
आता असे एकही घर नाही, जिथे मुले मोबाईलसाठी त्रास देत नाहीत.. मुलांचा वाढत्या मोबाईलवापराच्या अतिरेकाने पालकही हैराण आहेत. अशावेळीच यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बांशी गावाने चक्क ग्रामसभा घेऊन मोबाईलबंदी केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बांशी गावाने ११ नोव्हेंबर रोजी ग्रामसभा आयोजित करून मोबाईलबंदीचा निर्णय घेतला. किशोरवयीन मुलांना चांगल्या-वाईट गोष्टींची समज नसतानाच त्यांच्या हातात मोबाईल व इंटरनेटच्या जाळ्याचे जग सापडले आहे. त्यामुळे मुले मोबाईलच्या आहारी गेली आहेत.
मुळात ज्या गोष्टीसाठी मोबाईल वापराची सुरवात झाली, त्या ऑनलाईन शिक्षणाचा काहीच उपयोग झाला नाही, उलट मुले मोबाईलच्या आहारी गेल्याने सारेच तणावात गेले आहेत. मोबाईलबंदी तेवढी सोपी नाही हे गावकरीही जाणत आहेत. मात्र प्रसंगी दंड व कर लावू, मात्र मोबाईलबंदी यशस्वी करून दाखवू असा विश्वास या ग्रामसभेत पालकांनी व्यक्त केला.
या गावात आता यापुढे कोणीही पालक मुलांच्या हातात मोबाईल देणार नाही असा ठराव करण्यात आला व या ठरावाची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच गजानन टाले, उपसरपंच रेखा राठोड, गावातील शाळेचे मुख्याध्यापक यशवंत देशमुख आदी उपस्थित होते.