सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
मागील हंगामात छत्रपती कारखान्यात सभासदांना ऊस गाळप करण्यासाठी प्रचंड आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. असे असतानाच आता हंगाम सुरू होताच कारखान्याने गेटकेन ऊस सुरू केलेला आहे, दोन दिवसांपूर्वी गेटकेनच्या उसाचा साखर उतारा तपासला, तर तो ५.४४ टक्के एवढाच आला, त्यामुळे कारखान्याने प्रचंड नुकसान झाले आहे, गेटकेनच्या दरामध्ये काही मंडळींचे आर्थिक हितसंबंध आहेत, त्यामुळे छत्रपती कारखाना हा सभासदांचा आहे की गेटकेनधारकांचा असा सवाल कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केला आहे.
जाचक यांनी आज एक पत्रक प्रसिध्दीस देऊन संचालक मंडळावर आरोप केले आहेत. यामध्ये कारखान्याने तोडणी यंत्रणेसाठी ३५ कोटी रुपये अॅडव्हान्स दिली, मात्र यंत्रणा कमी आली, त्यामुळे गेटकेन घेण्याचे समर्थन संचालक मंडळ करीत आहे. तोडणी यंत्रणेचे नियोजन फसलेले आहे हे संचालक मंडळाचे अपयश असल्याचा जाचक यांनी आरोप केला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना एकरकमी एफआरपी मिळत असताना पुणे जिल्ह्यतील कारखाने व छत्रपती कारखाना अद्याप का गप्प आहेत असा सवालही जाचक यांनी केला आहे. याखेरीद कोल्हापूर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी एकरकमी एफआरपी देण्यासाठी साखरेच्या पोत्यावर जास्तीत जास्त उचल देण्याचा निर्णय घेतला, मग पुणे जिल्हा बॅंक का असा निर्णय घेत नाही असाही सवाल जाचक यांनी उपस्थित केला आहे.
छत्रपती कारखान्यावर निवडणूक लागेपर्यंत प्रशासकाची नियुक्ती करावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. कारखान्याची ४० हजार टन मळी व ३ लाख क्विंटल साखर ही हंगाम सुरू होण्यापूर्वीच विक्री केलेली असून त्यानंतर मळी व साखऱेच्या दरात वाढ झाली आहे, अजून वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे या अगाऊ विक्रीच्या व्यवहारामुळे झालेल्या नुकसानीला संचालक मंडळ जबाबदार आहे असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान कारखानयाने गेटकेन बंद न केल्यास व एकरकमी एफआरपी न दिल्यास कारखाना कार्यस्थळावर येऊन गेटकेनची वाहने बाहेर काढण्याचा इशारा जाचक यांनी दिला असून गेटकेन ऊस हा इंदापूर तालुक्यातील राजकारण करण्यासाठी आणण्याचे धोरण जाणीवपूर्वक राबवले जात आहे. इंदापूर तालुक्यातील एका ठिकाणाहून गेटकेन तोडीचे नियोजन केले जात असल्याचा आरोपही जाचक यांनी केला आहे.
कमी साखर उताऱ्याप्रकरणी कठोर कारवाई – प्रशांत काटे
दरम्यान पृथ्वीराज जाचक यांच्या आरोपानंतर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी ५.४४ टक्के साखर उताऱ्याचा जो ऊस कारखान्याच्या कार्यस्थळावर आला, त्याप्रकरणी संबंधित जबाबदार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून संबंधित शेतकऱ्यालाही दंड करण्यात आला असल्याचे सांगितले. याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचा निर्णय संचालक मंडळा्चया बैठकीत करण्यात आला असून यापुढील काळात अशा प्रकारची चूक होणार नाही यासाठी कडक अंमलबजावणी केली जात असल्याचे काटे यांनी सांगितले.