दौंड : महान्यूज लाईव्ह
पाटस – दौंड या अष्टविनायक महामार्गावर दौंड हद्दीत दौंड शुगर कारखान्याकडे ऊस भरून जात असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक देऊन अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. अशी माहिती दौंड पोलिसांनी दिली.
गणेश बापू शिंदे (वय २५), ऋषिकेश महादेव मोरे (वय २३) , स्वप्नील सतीश मनोचार्य (वय २४ तिघेही राहणार काष्टी, ता. श्रीगोंदा जि. नगर) अशी या अपघातात मृत्यू झाल्याची नावे आहेत. रविवारी (दि १३) रात्री साडेदहाच्या आसपास हा अपघात झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,
पाटस – दौंड अष्टविनायक रस्त्यावरून ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर हा पाटस बाजु कडून दौंड शुगर कारखान्याकडे जात असताना. त्याच्या पाठीमागून दुचाकीवरून काष्टीला चाललेल्या या दुचाकीने या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्याने दुचाकी चालकाला पुढे जात असलेल्या ट्रॅक्टरचा अंदाज आला नाही त्यामुळेच हा अपघात झाला असल्याचे प्रथम दर्शी नागरिकांनी सांगितले. या अपघाताला ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर चालक जबाबदार असल्याचे प्रथमदर्शनी नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, सध्या दौंड तालुक्यातील साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे ऊस वाहतूक करणारे वाहनांची संख्या ही ग्रामीण भागातील रस्त्यावरून ते महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहतूक पोलिसांनी या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सुरक्षा व दक्षता म्हणून ऊस उसाच्या ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाडी किंवा ट्रक या वाहनांनी पाठीमागून रिफ्लेक्टर बसविण्यासाठी वाहतूक पोलीस व दौंड पोलिसांकडून अनेक वेळा सूचना केल्या आहेत तसेच याबाबत पोलिसांनी जनजागृतीही केली आहे.
मात्र तरीही ऊस वाहतूक करणारे अनेक वाहनांचे चालक हे या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याने अपघातांचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर लावले नाही तर अशा वाहनांवर वाहतूक पोलीस व दौंड पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.